मराठी चित्रपटसृष्टीमधील ब्लॉकबस्टर सिनेमा म्हणून 'माहेरची साडी' ओळखला जातो. १९९१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिस अक्षरशः दणाणून सोडले होते. या चित्रपटाने त्याकाळी १२ कोटी रुपयांची कमाई केल्याचे म्हटले जाते. माहेरची साडी हा चित्रपट दादा कोंडकेंच्या पुतण्याने म्हणजेच विजय कोंडके यांनी बनवला होता. पण तुम्हाला माहिती आहे का माहेरची साडी सिनेमाचे यश आणि नावापासून प्रेरित होऊन दादा कोंडेकनी सासरचे धोतर हा विनोदी चित्रपट काढला होता. मात्र, या सिनेमामुळे दादा कोंडकेंना अनेक वादांना सामोरे जावे लागले होते.
अभिनेते दादा कोंडके यांच्या 'एकटा जीव' आत्मचरित्र्यामध्ये अनेक गोष्टींविषयी सांगण्यात आले आहे. अनिता पाध्ये लिखित या आत्मचरित्रात दादा कोंडके यांच्या 'सासरचं धोतर' या चित्रपटाविषयी सांगण्यात आले आहे. 'माहेरची साडी' हिट झाल्यांनतर एका कार्यक्रमात दादा गमतीने म्हणाले होते की, ''काढायचंच झालं तर मी 'माहेरची साडी' काढणार नाही, 'सासरचं धोतर' काढेन.'' ते ऐकून उपस्थित असलेल्या सर्वांना हसू अनावर झाले होते. दादा हे वाक्य बोलून विसरून देखील गेले होते. मात्र काही दिवसांनी दादांचे सहकारी मुजुमदार यांनी दादांना त्याची आठवण करून दिली. मुजुमदार म्हणाले, '' दादा, सासरचं धोतर हे टायटल चांगलं आहे. ज्या अर्थी 'माहेरची साडी' एवढ्या जोरात चालंलय, त्या अर्थी 'सासरचं धोतर' हे टायटलही लोकांच्या नक्कीच लक्षात राहील.
एक दोन गोष्टी सोडल्या तर या चित्रपटाची कथेचा माहेरची साडी चित्रपटाशी तसा काहीही संबंध नव्हता. एका माणसाला त्याच्या सासऱ्याने दिलेलं धोतर खूप लकी ठरलं, म्हणून तो त्या धोतराची पूजा करू लागतो अशा विनोदी कल्पनेवर आधारित दादांनी कथा लिहिली होती. सगळी तयारी करण्यात आली. चित्रपटाच्या शुटिंगला देखील सुरुवात झाली.
'सासरचं धोतर' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दादा कोंडके आणि पुतण्या विजय कोंडके यांच्यामध्ये वाद झाला. हा वाद आर्थिक आणि कौटुंबिक पातळीवर सुरु झाला होता. त्यामुळे दादा कोंडके आणि विजय कोंडके यांचे कुटुंब एकमेकांपासून दूर गेले होते. मीडियामध्ये देखील दादा आणि विजय कोंडके यांच्यात अनबन झाल्याच्या बातमी पसरू लागली होती. दादांना या गोष्टीचा प्रचंड त्रास होऊ लागला होता. या कारणामुळे दादांचे चित्रीकरणामध्ये फारसे लक्ष नव्हते.
दादांनी कसतरी घाईघाईत या चित्रपटाचं चित्रीकरण उरकलं. चित्रपटातली गाणी फार चांगली झाली नव्हती , दादादेखील पूर्वीप्रमाणे अभिनयात फारसे रंगले नाहीत. सुदैवाने या सगळ्याचा चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसावर फारसा परिणाम झाला नाही. चित्रपट बऱ्यापैकी चालला होता.
वाचा: 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाच्या ऑस्कर प्रवेशाचा दावा खोटा? FFIच्या अध्यक्षांनी सांगितले सत्य
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सर्वजण आनंदी होते. मात्र काहींनी दादांवर अनेक आरोप लावले. 'माहेरची साडी' चालला म्हणून दादांनी मुद्दाम विजयला दाखवून देण्यासाठी 'सासरचं धोतर' हा चित्रपट काढला. तसे पाहायला गेले तर दोन्ही चित्रपटांचा लांबलांब पर्यंत काहीच संबंध नव्हता. याविषयी आत्मचरित्र्यामध्ये दादा कोंडके म्हणाले होते की, "चित्रपटात मी कुठेही 'माहेरच्या साडी 'चा उल्लेख केला नव्हता. फक्त एकच संवाद त्यात मी टाकला होता की, तुम्हाला माहेरची साडी आवडते आणि सासरचं धोतर आवडत नाही म्हणजे कमाल झाली. धोतराने तुमचं काय घोड मारलंय? खरोखरच जर मला 'माहेरची माडी' वर टीका करायची असतो तर मी पार धुव्वा उडवला असता. पण म्हणतात ना, परिस्थिती बदलली की बोलण्याचे संदर्भही बदलतात."