Jacqueline Fernandez: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा ११ ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. या खास प्रसंगी दिल्लीतील तुरुंगात बंद असलेल्या ठग सुकेश चंद्रशेखरने आपली तिजोरी उघडली आहे. त्याने अभिनेत्रीच्या नावाने एक पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये त्याने तिला देत असलेल्या वाढदिवसाच्या भेटवस्तूंचा उल्लेख केला आहे. या यादीमध्ये खाजगी यॉटपासून ते चाहत्यांसाठी १०० आयफोन, वायनाड, केरळमधील भूस्खलनग्रस्तांसाठी १५ कोटी रुपयांची देणगी आणि ३०० घरे बांधण्याचे आश्वासन यांचा समावेश आहे. सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिन फर्नांडिसला लिहिलेल्या पत्रात तिच्या वाढदिवशी अभिनेत्रीवरचे प्रेम व्यक्त केले आहे. तिला 'माझी बेबी, माय बम्मा' म्हणत सुकेशने जॅकलिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विभक्त असूनही आपले विचार आणि आत्मा एकमेकांशी जोडलेले असल्याचे त्याने या पत्रात म्हटले.
सुकेशने या पत्रात लिहिले की, त्याच्याकडे जॅकलिनसाठी वाढदिवसाचे खास गिफ्ट आहे. केरळच्या वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांना मदत करण्यासाठी मी १५ कोटी रुपयांची देणगी देण्याचे वचन देत आहे आणि या दुर्घटनेत बाधित झालेल्यांसाठी ३०० घरे बांधून देण्याचे आश्वासन देखील देत आहे. सुकेशने यावर जोर दिला की, कोणतीही भौतिक भेटवस्तू- जेट, यॉट, बर्किन बॅग किंवा हिरा जॅकलिनला इतरांना मदत करण्याइतका आनंद देऊ शकत नाही. म्हणूनच तिला भरपूर आनंद मिळावा यासाठी, सुकेशने या वचनांची पूर्तता करण्यासाठी केरळ सरकारसोबत काम करण्यासाठी संपूर्ण टीम तैनात केल्याचा उल्लेख केला आहे.
याशिवाय सुकेशने जॅकलिनला एक सरप्राईज दिले आहे. 'लेडी जॅकलिन' नावाची यॉट, जी त्याने २०२१मध्ये पाहिली होती. ही यॉट पूर्णपणे कायदेशीररित्या आणि कर भरून खरेदी केली गेली आहे. ती या महिन्यात वितरित केली जाईल. दोघांनीही स्वप्न पाहिलं होतं की, ते या यॉटमध्ये एकत्र वेळ घालवतील. म्हणूनच त्याने ती विकत घेतली आहे. सुकेशला जॅकलिनची खूप आठवण येत आहे. तसेच, तिला झालेल्या सर्व वेदनांची भरपाई करण्याचे आश्वासन त्याने या पत्रात दिले आहे. आम्ही ११ ऑगस्ट २०२५ रोजी 'रोमिओ आणि ज्युलिएट' स्टाईलमध्ये एकत्र वाढदिवस साजरा करू, असे त्याने म्हटले. त्याने या पत्रात असेही सांगितले की, ज्या १०० चाहत्यांनी त्याला खूप पाठिंबा दिला, त्यांना तो आयफोन १५ प्रो देणार आहे. यासाठी त्याची टीम यूट्यूबवरून विजेत्यांची निवड करेल.