Complaint File Against Nayanthara Annapoorani: मनोरंजन विश्वाची ‘लेडी सुपरस्टार’ अर्थात अभिनेत्री नयनतारा आता मोठ्या अडचणीत सापडली आहे. हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या प्रकरणी आता तिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नयनताराचा नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला चित्रपट ‘अन्नपूर्णी’ तिच्या या अडचणीचं कारण ठरला आहे. अनेक वादग्रस्त डायलॉग्स आणि दृश्यांवरून झालेल्या वादानंतर आता नेटफ्लिक्सने देखील हा चित्रपट हटवला आहे. मात्र, याआधीच नयनतारा विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
‘अन्नपूर्णी’ या चित्रपटातून भगवान रामाचा आणि हिंदू धर्माचा अपमान केल्याचे या तक्रारीत म्हणण्यात आले आहे. या चित्रपटातील एका दृश्यात भगवान राम हे मांसाहारी असल्याचे म्हटले गेले होते. तर, अशाच एका दुसऱ्या दृश्यात हिंदू मुलगी डोक्याला कपडा बांधून नमाज पडताना दाखवून, लव्ह जिहादला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप या चित्रपटावर आणि मेकर्सवर करण्यात आला आहे. ‘अन्नपूर्णी’ या चित्रपटामध्ये नयनतारा हिने एका हिंदू मुलीची भूमिका केली आहे. मात्र, तरीही तिच्यावर नमाज पढतानाचा एक सीन चित्रित केला गेला आहे.
‘अन्नपूर्णी’च्या या एका सीनमध्ये जेवण बनवण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेताना नायिका डोक्यावर ओढणी बांधून नमाज पढताना दाखवली आहे. कॉलेजमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आपल्या मित्रांना चविष्ट बिर्याणी खायला देता यावी, म्हणून ती आधी नमाज अदा करते. यामुळे तिची बिर्याणी अधिक रुचकर बनते, असे तिला वाटते. म्हणूनच ती पुढे प्रत्येक वेळी हीच गोष्ट करत राहते. याच सीनमुळे वादंग मजला आहे. तर, दुसऱ्या एका सीनमध्ये नायिकेचा मित्र तिला मांस खाऊ घालण्यासाठी भगवान राम मांसाहारी असल्याचं उदाहरण देतो. यासोबतच या चित्रपटातून हिंदू धर्म ग्रंथ आणि पुराणांचा विपर्यास केला गेला आहे, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
शिवसेनेचे माजी नेते रमेश सोळंकी यांनी या चित्रपटाला हिंदूविरोधी म्हटले असून, चित्रपटाच्या निर्मात्यांवर कारवाई करून एफआयआरही नोंदवावा, अशी मागणी मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. नयनतारा आणि जय यांच्याशिवाय चित्रपटाचे दिग्दर्शक नीलेश कृष्णा, झी स्टुडिओ, नाद स्टुडिओ, ट्रायडेंट आर्ट्स, नेटफ्लिक्स आणि झी स्टुडिओचे प्रमुख शारिक पटेल यांचीही उल्लेख या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे हिंदू सेवा परिषदेने या चित्रपटाविरोधात जबलपूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.