छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कॉमेडी शो म्हणून 'द कपिल शर्मा' म्हणून ओळखला जातो. पण काही दिवसांपूर्वी या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर 'द ग्रेट इंडियन कपिल शो' या नावाने हा शो नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. काही मोजक्याच एपिसोडनंतर या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला. शो चालत नसल्यामुळे लवकर बंद झाल्याची चर्चा रंगली होती. आता यावर कॉमेडियन राजीव ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हा शो चालला की आपटला यावर वक्तव्य केले आहे.
कॉमेडियन राजीव ठाकूर यांना कोण ओळखत नाही. कॉमेडी सर्कस आणि द कपिल शर्मा शोनंतर ते प्रसिद्ध झाले. नुकताच राजीव कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा देखील भाग झासे होते. आता त्यांनी या शोच्या यशाबद्दल सांगितले आहे. राजीव ठाकूर म्हणले की, 'हा शो चालला नाही असा लोकांचा गैरसमज आहे. कपिल शर्मा गेल्या अनेक वर्षांपासून टीव्हीवर कॉमेडी शो आणत आहे, पण नुकताच त्याचा द ग्रेट इंडियन कपिल शो ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर आला. हा शो चांगला चालला होता.'
राजीव ठाकूर यांनी नुकताच 'टेली चक्कर'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये राजीव यांना प्रश्न विचारण्यात आला की, 'कपिल शर्माचा कॉमेडी शो टीव्हीवर इतका चांगला चालतो, पण नेटफ्लिक्सवर फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही.' यावर कॉमेडियन राजीव म्हणाले, 'खरं तर लोकांचा हा गैरसमज आहे की हा शो चालला नाही. कदाचित सगळ्यांना टीव्ही पाहता येणार नाही. पण नेटफ्लिक्सवर चालला नसता तर दुसरा सीझन बनला नसता. ते खूप प्रोफेशनल आहेत, बाहेरची कंपनी आहे आणि ते फक्त आकडे पाहतात.'
कॉमेडियन राजीव यांनी या मुलाखतीमध्ये दावा केला की, 'द कपिल शर्मा शोमुळे नेटफ्लिक्स पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कपिल शर्माच्या चाहत्यांनी नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन घेतले आणि त्याचा कॉमेडी शो पाहिला. हा शो एक यशस्वी प्रोजेक्ट आहे. कारण त्याच्याकडे प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळण्याची क्षमता आहे. द ग्रेट इंडियन कपिल शोचा दुसरा सीझनही लवकरच नेटफ्लिक्सवर येत आहे. त्यामुळे पहिल्या सीझनच्या यशाचा अंदाज तुम्ही लावू शकता.'
वाचा: ‘तारक मेहता...’ मालिकेतील अभिनेत्रीचा संसार मोडला; लग्नाच्या ७ वर्षांनंतर पतीपासून विभक्त होणार!
नुकतीच कपिल शर्माने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शोच्या दुसऱ्या सीझनची माहिती दिली. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा दुसरा सीझन घेऊन तो परत येत असल्याचे त्याने सांगितले होते. नेटफ्लिक्सने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यात कपिल शर्मा, अर्चना पूरन सिंह, सुनील ग्रोव्हर, राजीव ठाकूर आणि इतर कलाकार दिसणार आहेत. मात्र, दुसरा सीझन कधी सुरू होणार याची माहिती देण्यात आलेली नाही. चाहते या दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहात आहेत.