लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन ख्याली सहारनवर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ वर्षीय तरुणीने तक्रारीमध्ये ख्यालीने जयपूरमधील हॉटेलच्या खोलीत बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. गुरुवारी या प्रकरणी पोलिसांनी माहिती दिली आहे.
ख्याली हा आप या पक्षाचा कार्यकर्ता होता. त्याने एका तरुणीला नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानंतर १३ मार्च रोजी जयपूरमधील मानसरोवर परिसरातील एका हॉटेलमध्ये मद्यधुंद अवस्थेत त्याने बलात्कार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. आयपीसी कलम 376 अंतर्गत ख्यालीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा: किडनीला इंफेक्शन झाल्यामुळे शिवांगी जोशी रुग्णालयात दाखल, जाणून घ्या प्रकृतीविषयी
पोलीस उपनिरीक्षक संदीप यादव यांनी या प्रकरणाची माहिती देताना म्हटले की, "तरुणीच्या तक्रारीनंतर ख्यालीविरुद्ध आयपीसी कलम 376 (बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस सध्या करत आहेत."
आरोप करणारी तरुणी कोण?
ख्यालीवर आरोप करणारी तरुणी ही श्रीगंगानगरची रहिवासी आहे. ती एका फर्ममध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत आहे. काही महिन्यापूर्वी ती मैत्रिणीसोबत ख्यालीकडे मदत मागण्यास गेली होती. त्यानंतर ते दोघे संपर्कात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ख्यालीने हॉटेलमध्ये दोन रुम बुक केल्या होत्या. एक स्वत:साठी आणि दुसरी या तरुणींसाठी. ख्याली स्वत: मद्यपान करत होता आणि त्याने तरुणींना देखील मद्यपान करण्यास भाग पाडले. त्यानंतर काही वेळात एक तरुणी तेथून निघून गेली आणि ख्यालीने दुसऱ्या तरुणीवर बलात्कार केला.
ग्रेट इंडियन चॅलेंज सीजन 2 मध्ये ख्यालीने सहभाग घेतला होता. या सीझनचा विजेता रौफ लाल हा ठरला होता. ‘द कपिल शर्मा शो’या शोमध्ये देखील ख्यालीने हजेरी लावली होती