आपल्या सुखी संसाराची स्वप्ने पूर्ण करायला वेगवेगळ्या कसोट्यांमधून जावे लागते. परिस्थितीच्या वेगवेगळ्या वादळातून जाताना एकमेकांचा विश्वास , प्रेम आणि परस्परांची साथ जपत मार्ग काढता येतात. असेच काहीसे खडतर प्रयत्न 'सुख कळले' मालिकेतील माधव- मिथिला करत होते. पण अचानक त्यांच्या आयुष्यात आलेल्या वादळामुळे मिथिलाच्या संसाराची घडी पडली आहे. पण तिचे कुटुंबीय तिच्या पाठीमागे उभे आहेत. त्यामुळे मिथिला आता तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे.
आजच्या काळातील स्त्री खचते आणि त्यातून खंबीरपणे स्वत:च्या पायावर उभी राहते याचं प्रतिक 'सुख कळले' मालिकेतील मिथिलाच्या रुपात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आजच्या युगातील मल्टीटास्किंग करणाऱ्या स्त्रीला प्रतिनिधित्व करणारी मिथिला प्रेक्षकांना आता 'सुख कळले' या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
'सुख कळले' या मालिकेत मिथिलाची भूमिका अभिनेत्री स्पृहा जोशी साकारत आहे. ती मिथिलाच्या नव्या प्रवासाबद्दल बोलताना म्हणाली, "मिथिला या व्यक्तीरेखेचा आताचा प्रवास खूप मनोरंजक आहे. बऱ्याचदा आपल्याला आसपास अनेक आत्मविश्वासू स्त्रिया दिसतात. ज्यांची स्वत:ची मते असतात. आपल्या कुटुंबीयांसाठीसुद्धा त्या तितक्याच खंबीरपणे उभ्या राहतात. काही वेळेस अशा व्यक्तींच्या आयुष्यात अचानक एखादी घटना घडते आणि त्यांना मुळापासून हादरवून टाकते. त्यामुळे त्यांचा सगळा आत्मविश्वास डळमळतो आणि त्या व्यक्ती कोलमडून जातात. अशा व्यक्तींना कुटुंबाचा भक्कम पाठिंबा मिळतो आणि ते त्याच्या आधारावर पुन्हा नव्याने उभ्या राहतात."
स्पृहा पुढे म्हणाली, “मिथिलाचा आता सुरू असलेला प्रवासदेखील याच पद्धतीचा आहे. आता तिच्या नव्या प्रवासाची सुरुवात होणार आहे. आता ती हरवलेल्या स्वत:ला शोधतेय, तिचा आत्मविश्वासही शोधतेय. एक नव्या जिद्दीने ती हा विचार करतेय की, माधवसोबतच्या अन्यायावर आपल्याला कशी मात करता येईल. त्याला न्याय कसा मिळवून देऊ शकतो. या सगळ्या प्रवासात तिच्या व्यक्तीमत्त्वातही बदल होतो. तिला एक नवं जग खुणावतंय आणि त्या नव्या विश्वाचा भाग होऊ पाहतेय. नव्याचा शोध घेणारी ही मिथिला आहे. त्यामुळे राहणीमानासह तिच्या अनेक गोष्टींत बदल होतो. मिथिला आता स्वत:वर जास्तीत जास्त प्रेम करायला लागली आहे.”
वाचा: जॉन अब्राहमनं घेतली ऑलिम्पिक पदक विजेत्या मनू भाकर हिची भेट! फोटो पाहून नेटकरी संतापले, काय आहे कारण?
स्वतंत्र विचारांची, आत्मविश्वासू, स्पष्टवक्ती, आऊट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करणारी मिथिला प्रेक्षकांना येत्या 15 ऑगस्टनंतर 'सुख कळले' या मालिकेत पाहायला मिळणार आहे. आजच्या युगातील महिलांसाठी ती नक्कीच प्रेरणादायी आहे.