छोट्या पडद्यावरील अतिशय हिट मालिका म्हणून 'दिल दोस्ती दुनियादारी' ओळखली जात होती. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरीही कायम चर्चा रंगत असते. आता अशाच मैत्रिच्या नात्यावर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे नाव 'पिंगा गं पोरी पिंगा' असे आहे. या मालिकेत सर्व वयोगातील महिलांची मैत्री दाखवण्यात येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.
'पिंगा गं पोरी पिंगा' या भन्नाट मालिकेच्या माध्यमातून 'कलर्स मराठी'ने प्रेक्षकांना नवं सरप्राईज दिलं आहे. एक युनिक स्टोरी प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. समोर आलेली मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.
कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'पिंगा गं पोरी पिंगा' या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये मुंबईतील एका आलिशान सोसायटीत चार मुली आधीपासून पेइंग गेस्ट म्हणून राहत असल्याचे दाखवण्यात आले आहे. आता त्यांच्यात भर पडते पाचव्या मुलीची. आधीपासून राहणाऱ्या पेइंग गेस्ट मुलींबद्दल सोसायटीतील काकूंना फारसं पटत नाही. त्यामुळे घरात शिरणाऱ्या नव्या मेंबरलाही त्या जर्ज करतात. पण बाकीच्या मुली मात्र या नव्या मेंबरला लगेचच आपलंसं करत एक आत्मविश्वास देतात आणि लोकांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्लाही देतात.
वेगवेगळ्या शहरांतून मायानगरी मुंबईत आलेल्या आणि एका बड्या सोसायटीत पेइंग गेस्ट म्हणून राहत असलेल्या पाच मुलींभोवती फिरणारं या मालिकेचं कथानक आहे. या पाचजणी काय धमाल करणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 'कलर्स मराठी'वरील 'रमा राघव' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री ऐश्वर्या शेट्ये पुन्हा एकदा या मालिकेच्या माध्यमातून छोटा पडदा गाजवायला सज्ज आहे. ऐश्वर्यासह विदिशा म्हसकर, शाश्वती पिंपळीकर, प्राजक्ता परब आणि आकांक्षा गाडे या अभिनेत्री या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
वाचा: पतौडी शाही पॅलेस बनणार म्यूझियम? सैफ अली खानने सांगितले सत्य, वाचा…
आजवर पुरुषांच्या मैत्रीवर आधारित अनेक चित्रपट, मालिका, नाटक, वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. पण महिलांच्या मैत्रींवर भाष्य करणाऱ्या कलाकृती खूप कमी आहेत. वर्षभरापूर्वी रिलीज झालेल्या 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीच्या हृदयात विशेष जागा निर्माण केली. या चित्रपटानंतर 'कलर्स मराठी'ने 'बाईपण भारी रं' या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम महिलावर्गाला एक खास सरप्राईज दिलं. या मालिकेच्या पाठोपाठ 'पिंगा गं पोरी पिंगा' ही नवी मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.
'कलर्स मराठी' वाहिनीवर सध्या अनेक नव्या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. 'आई तुळजाभवनी','अशोक मामा','बाईपण भारी रं' या मालिकांनंतर लवकरच 'पिंगा गं पोरी पिंगा' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच या मालिकेची पहिली झलक समोर आली आहे.