गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावरील अनेक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसत आहेत. त्यासोबतच नव्या मालिका देखील सुरु होत असल्याने प्रेक्षक आनंद व्यक्त करत आहेत. आता कलर्स मराठी वाहिनीवरील जुन्या दोन मालिकांनी निरोप घेतला आहे. या मालिकांच्या वेळेत आता नव्या मालिका सुरु होणार आहेत. या दोन्ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरणार अशी आशा व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्राचे महानायक अशोक सराफ म्हणजेच आपले लाडके अशोक मामा. विनोदाचा बादशहा म्हणून त्यांची ओळख असली तरी हसता हसता डोळ्यातून पाणी आणणाऱ्या भावना निर्माण करणं ही सुद्धा त्यांची खासियत आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहे. अशोक मामांनी आजपर्यंत हिंदी, मराठी अशा वेगवेगळ्या भाषांतील सिनेविश्वावर अधिराज्य केलं. 2006 साली ते करत असलेली प्रसिद्ध हिंदी मालिका 'हम पांच' संपली तेव्हा त्यांनी मालिका विश्वाची रजा घेतली. त्यानंतर ते छोट्या पडद्यावर मालिकेमध्ये कधी दिसले नाहीत. पण आज अनेक वर्षांनी अशोक मामांना पुन्हा छोट्या पडद्याने खुणावलं. ते 'कलर्स मराठी'वर येणाऱ्या 'अशोक मा.मा.' या मालिकेत दिसणार आहेत.
'पिंगा गं पोरी पिंगा' ही देखील एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेची गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या त्या सगळ्या महिलांची ज्यांच्या मनात भविष्याची स्वप्न आहेत. स्वत: काहीतरी करुन दाखवायची जिद्द आहे आणि त्यासाठी घरापासून दूर बाहेरच्या जगात स्वत:चं अस्तित्व उभं करण्याची त्यांची धडपड सतत सुरू असते. या धडपडीत जेव्हा आपल्या सारख्याच अनेक सख्या त्यांना सापडतात तेव्हा त्या मैत्रीची रंगत जगावेगळी असते.
वाचा : चार वर्षांनी मायदेशी परतलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीचे व्यवसायात पदार्पण, मुंबईत सुरू केले रेस्टॉरंट
महाराष्ट्राचे महानायक अशोक सराफ छोटा पडदा गाजवायला सज्ज झाले आहेत. अशोक मा.मा ही मालिका २५ नोव्हेंबर पासून रात्री साडे आठ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच प्रत्येक महिलेच्या मनाचा आरसा दाखवणारी 'पिंगा गं पोरी पिंगा' ही नवी मालिका देखील २५ नोव्हेंबरला सुरु होणार आहे. ही मालिका संध्याकाळी साडेसात वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोन्ही मालिकांची प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रेक्षक २५ नोव्हेंबरची वाट पाहात आहेत.