कलर्स मराठी वाहिनीवरील 'अबीर गुलाल' ही प्रेक्षकांची प्रचंड आवडती मालिका आहे. मालिकेत निरनिराळे ट्विस्ट येत आहेत. त्यामुळेच ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते आहे. आता या मालिकेत नाट्यमय वळण आले आहे. शुभ्रा आणि अगस्त्यचा थाटामाटात साखरपुडा पार पडणार आहे. अगस्त्यसोबत नव्या आयुष्याची सुरुवात करण्यास शुभ्रा आता सज्ज आहे. श्रीने आतापर्यंत अगस्त्यकडे आपल्या प्रेमाची कबुली दिलेली नाही. त्यामुळे शुभ्रा आणि अगस्त्यचा साखरपुडा होताना पाहून तिला मोठा धक्का बसणार आहे.
'अबीर गुलाल' मालिकेत श्रीला तिचे खरे सत्य कळल्यानंतर शुभ्राला त्रास होऊ नये म्हणून ती तिच्या हक्काचे घर सोडून जाते. श्री हरवल्यामुळे अगस्त्य मात्र हैराण होतो आणि त्याच्या आईला म्हणतो, "जोपर्यंत श्री सापडणार नाही तोपर्यंत मी साखरपुड्याला उभा राहणार नाही." त्यामुळे साखरपुडाही पुढे ढकलला जातो. अगस्त्य रात्रभर फिरून श्रीला शोधतो आणि तिला घरी घेऊन येतो.
दुसरीकडे, शुभ्राने मागवलेले डीएनए टेस्टचे रिपोर्ट्स समोर येतात आणि श्री ही गायकवाडांची खरी मुलगी असल्याचं शुभ्राला कळतं आणि तिला मोठा धक्का बसतो. अशातच श्री घरी परत आल्यानंतर शुभ्रा आणि अगस्त्यचा साखरपुडा पार पडतो. आपलं अगस्त्यवर प्रेम असल्याचं श्री मात्र मनातच ठेवते. दरम्यान शुभ्रा आणि अगस्त्यच्या लग्नात कोणतंही विघ्न येणार नाही, असं प्रॉमिस श्री सुलोक्षणा निंबाळकरांना करते. आता शुभ्राचा नवा डाव काय असणार? अगस्त्य आणि शुभ्राच्या लग्नात नवं विघ्न येणार का? की श्री आणि अगस्त्यच लग्नबंधनात अडकणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
'अबीर गुलाल' मालिकेत श्री ही भूमिका अभिनेत्री पायल जाधव साकारत आहे. मालिकेविषयी बोलताना ती म्हणाली, “मालिकेतील प्रत्येक सीन छान पद्धतीने लिहून आल्याने ते करायला मजा येते. अगस्त्यसारखा मित्र प्रत्येकाला आपल्या आयुष्यात हवाच असतो. निखळ मैत्री ते प्रेमात पडणं हा प्रवास खूप गंमतीदार होता. श्री आता अगस्त्यच्या पूर्णपणे प्रेमात आहे. अभिनेत्री म्हणून या मालिकेत मला खूप खेळायला मिळतं. रोज वेगवेगळे सीन करताना त्यातले चढ-उतारपाहून खूप शिकायलादेखील मिळते.”