Antarpat Serial Update : कलर्स मराठी वाहिनीवरील 'अंतरपाट' ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेत क्षितिज आणि गौतमीची कथा दाखवण्यात आली आहे. त्या दोघांमध्ये फुलत असलेली मैत्री प्रेक्षकांना विशेष आवडताना दिसत आहे. दरम्यान, मालिकेत आता रक्षाबंधन विशेष भाग पार पडणार आहे. १७ ऑगस्टला मालिकेतील जान्हवी ही गौतमीला राखी बांधताना दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या भागाविषयी उत्सुकता वाढली आहे.
'अंतरपाट' या मालिकेत नुकतचं गौतमीने आपल्या जीवावर उधार होऊन जान्हवीला मुंबईहून सुखरुप कोकणात आणले आहे. तसेच तिला आश्रयदेखील दिला आहे. गौतमीने जान्हवीचे एका भावाप्रमाणे रक्षण करत तिचा जीवदेखील वाचवला आहे. जो आपले रक्षण करतो त्याला आपण रक्षाबंधनाला राखी बांधत असतो. याप्रमाणेच जान्हवीसाठी आपली रक्षणकर्ती गौतमी असल्याने ती तिलाच राखी बांधताना दिसणार आहे.
'अंतरपाट' मालिकेत सध्या क्षितिज आणि गौतमीची मैत्री फुलताना दिसत आहे. घरच्यांनी त्यांच्या संसाराचा घाट घातल्याने त्यांनी सुखी संसाराचे नाटक काही दिवस सुरूच ठेवण्याचे ठरवले आहे. अशातच मालिकेत अनेक रंजक वळणे येणार आहेत. क्षितिज गौतमीमध्ये गुंतत चालल्याचे जान्हवीला जाणवते. त्यामुळे गौतमीला सर्व काही खरे सांगून तिच्या आयुष्यातून कायमचे निघून जाण्याचा निर्णय जान्हवीने घेतला आहे.
वाचा : मुलगी पलकच्या इब्राहिम अलीला डेट करण्याच्या वृत्तावर श्वेता तिवारीने अखेर सोडले मौन
'अंतरपाट' मालिकेत गौतमी ही भूमिका अभिनेत्री रश्मी अनपट साकारताना दिसत आहे. तर जान्हवी ही भूमिका प्रतीक्षा शिवणकर साकारत आहे. रश्मी अनपटने या विशेष भागाबाबत वक्तव्य केले आहे. "आजपर्यंत रक्षाबंधन म्हटलं की बहिणीने भावाला राखी बांधणं, ओवाळणं हेच मी करत आली आहे. पण जेव्हा जान्हवी मला म्हणाली की आज मला तुम्हाला राखी बांधायची आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मला वाटतं, रक्षाबंधन हे फक्त भाऊ आणि बहिण या नात्यापुरतं मर्यादित न राहता दोन बहिणीदेखील रक्षाबंधन साजरं करू शकतात. राखी बांधण्यामागे आपल्या भावाने आयुष्यभर आपली काळजी घ्यावी हीच भावना असते. आता जान्हवीने मला राखी बांधण्यामागेदेखील हाच विचार आहे. त्यामुळे आता जान्हवीच्या प्रत्येक सुख-दु:खात मी सहभागी आहे" असे रश्मी म्हणाली. जान्हवीच्या भूमिकेत दिसणारी प्रतीक्षा शिवणकरने देखील आनंद व्यक्त केला आहे.