Coldplay Chris Martin Viral Video : ब्रिटीश रॉक बँड ‘कोल्डप्ले’ने भारतात आपला 'म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर' सुरू केला आहे. परदेशाव्यतिरिक्त भारतातही कोल्डप्लेची क्रेझ प्रचंड आहे. या कॉन्सर्टची तिकिटे ऑनलाइन आल्यानंतर काही मिनिटांतच विकली गेली. यावरूनच तुम्ही या गायकाच्या लोकप्रियतेचा अंदाज लावू शकता. या म्युझिक टूरची पहिली मैफल काल संध्याकाळी झाली आणि त्याची झलक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कॉन्सर्टमधून काही व्हिडिओ आता व्हायरल झाले आहेत.
कोल्डप्लेचा पहिला कॉन्सर्ट १८ जानेवारीला मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झाला. या कॉन्सर्टमध्ये ख्रिस मार्टिनने वर्चस्व गाजवले. तो या बँडचा मुख्य गायक आहे आणि त्याने आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यलो, फिक्स यू, ए स्काय फुल ऑफ स्टार्स अशा गाण्यांनी त्यांनी मैफलीत रसिकांना मंत्रमुग्ध केले.
सुंदर गाण्यांदरम्यान, कोल्डप्ले गायक ख्रिस मार्टिनने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये असे काही केले की, ज्यामुळे चाहत्यांना अतीव आनंद झाला. या म्युझिक कॉन्सर्टमध्ये ख्रिसने 'जय श्रीराम'ची घोषणा दिली. या संगीत कार्यक्रमात एक चाहता हातात 'जय श्रीराम'चा फलक घेऊन उभा होता. ख्रिसने वेळ वाया न घालवता क्लॅपबोर्डवर लिहिलेले 'जय श्रीराम' मोठ्याने वाचले. पण, मग त्याने याचा अर्थ काय ते विचारले. 'याचा अर्थ चांगलाच असला पाहिजे', असे तो म्हणाला. मात्र, ख्रिसने जय श्रीराम म्हणताच संपूर्ण स्टेडियम दणाणून गेला.
ख्रिस मार्टिनने या कार्यक्रमात जय श्री राम म्हटल्यानंतर हिंदी भाषेत संवाद साधत प्रेक्षकांना अभिवादन केले. त्याने पहिला मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला आणि आणि नंतर हिंदीत म्हटले, 'तुमचे सर्वांचे आमच्या शोमध्ये स्वागत आहे. आम्हाला मुंबईत येऊन खूप आनंद होत आहे.' यानंतर गायकाने हिंदी आणि मराठी नीट न बोलता आल्याबद्दल माफी मागितली. तो म्हणाला, ‘माफ करा, माझे हिंदी आणि मराठी चांगले नाही, पण मी चांगला प्रयत्न केला आहे.’
कोल्डप्लेचा पुढचा शो आज आणि मंगळवारी म्हणजेच २०-२१ जानेवारी रोजी मुंबईत रंगणार आहे. यानंतर २५ आणि २६ जानेवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा ब्रिटिश बँड परफॉर्म करणार आहे.
संबंधित बातम्या