टेलिव्हिजनचा आवडता क्राइम बेस्ड शो सीआयडी हा नेहमीच प्रेक्षकांचा आवडता शो राहिला आहे. टीव्हीवर या मालिकेचा बराच काळ दबदबा होता. अनेकांनी मालिकेतील दया प्रमाणे दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला होता. सीआयडी मालिका पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण पुन्हा एकदा सीआयडी मालिका टीव्हीवर धडक देणार आहे. अशातच सीआयडीची पहिली झलक रिलीज झाली आहे, त्यानंतर चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पण पहिल्याच प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेल्या सीन्सने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सगळ्यांचा आवडता CID सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर रोमांचक पुनरागमन करत आहे त्यामुळे दोन दशकांपेक्षा जास्त काळ ज्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांचे अपार मनोरंजन केले, ते कलाकार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ही बातमी ऐकून प्रेक्षक आनंदले आहेत आणि आपल्या बालपणीच्या आठवणी पुन्हा जिवंत करत असल्याबद्दल निर्मात्यांना धन्यवाद देत आहेत. पण या प्रोमोमध्ये एक अनपेक्षित आणि अविश्वसनीय खोच आहे. एके काळी जिवलग दोस्त असणारे अभिजीत आणि दया आता एकमेकांचे शत्रू झाले आहेत.
सीआयडी मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच सोनी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अभिजीत आणि दया डोंगराच्या एका टोकावर उभे असतात. तेव्हा अभिजीत दयावर गोळी झाडतो. एसीपी प्रद्युमन अभिजीतला थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण तो कोणाचे ऐकत नाही. जे देशासाठी नेहमी एक होऊन लढले आहेत ते आज शत्रू बनून एकमेकांसमोर का उभे आहेत? अभिजीतने दयाला का मारले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: नगरसेवकाने फसवून केले होते ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीशी लग्न, पहिल्या पत्नीने समोर आणले सत्य
सीआयडी मालिकेत ACP प्रद्युमन हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ही भूमिका करणारे शिवाजी साटम म्हणतात, “मालिकेच्या या आवृत्तीत दया-अभिजीत यांची जोडगोळी तुटली आहे आणि आता दोघे एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. सीआयडीचा पायाच हलून गेला आहे. आणि एसीपी प्रद्युमनचे विश्व उलट-पालट होणार आहे. सहा वर्षांनी पुन्हा एसीपी प्रद्युमन म्हणून परत येणे स्वप्नवत वाटते आहे. या व्यक्तिरेखेला भरभरून प्रेम मिळाले आहे आणि आम्ही प्रेक्षकांना रहस्य आणि हृदयाची धडधड वाढवणाऱ्या नाट्याने भरलेली थरारक सफर घडवण्याची हमी देतो.”
संबंधित बातम्या