Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'मधील छोटा पुढारी दिसणार सिनेमात, टीझर पाहून चाहते खूश
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'मधील छोटा पुढारी दिसणार सिनेमात, टीझर पाहून चाहते खूश

Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'मधील छोटा पुढारी दिसणार सिनेमात, टीझर पाहून चाहते खूश

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 08, 2024 02:29 PM IST

Chota Pudhari: बिग बॉस मराठी ५ मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला छोटा पुढारी आता चित्रपटात दिसणार आहे. त्यामुळे सर्वांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस मराठी पाहिला जातो. नुकताच या शोचा पाचवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यंदाच्या सिझनमध्ये सोशल मीडिया इन्फ्लूएंसर आणि कलाकार हे दोन्ही दिसले होते. त्यामध्ये छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोवडे देखील सहभागी झाला होता. आता तो चित्रपटात दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. तो 'कर्मयोगी आबासाहेब' या चित्रपटात भूमिका साकारणार आहे.

सोलापूरच्या सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख तब्बल ११ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले, राज्याचे कॅबिनेट मंत्री राहिलेल्या स्वर्गीय मा. गणपतराव देशमुख म्हणजेच ऊर्फ आबासाहेब यांचं जीवन आणि कार्य आता चित्रपटातून उलगडणार आहे. 'कर्मयोगी आबासाहेब' चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच चर्चा रंगली होती. आता चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे.

काय आहे टीझर?

'कर्मयोगी आबासाहेब' या आगामी चित्रपटाच्या ५२ सेकंदाच्या टीझरमध्ये आबासाहेबांची झलक पाहायला मिळत आहे. टीझरमध्ये आबासाहेबांच्या जीवनातील अनेक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. त्यांच्या लहानपणापासून ते राजकारणापर्यंतचा प्रवास चित्रपटातून उलगडणार असल्याचे दिसत आहे. टीझरमध्ये एकही डायलॉग ऐकू येत नसला तरी म्यूझिक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

आबासाहेबांविषयी

राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण आता चांगलंच तापू लागलं आहे. राजकीय विषयावरचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. अशातच सोलापूर जिल्ह्यासह राज्याला दिशा देणारे मा. गणपतराव देशमुख यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेत त्यांचं महान कार्य समाजापुढे आणण्याचा प्रयत्न कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटातून करण्यात आला आहे. आबासाहेब अकरा वेळा आमदार म्हणून निवडून आले असले तरी त्यांनाही संघर्ष चुकला नव्हताच. राजकारण, त्यातले डाव प्रतिडाव यापेक्षा समाजाचा विचार करत विकास, सुधारणा, शेतकरी, वंचित घटकांसाठी आबासाहेबांनी काम करण्यास प्राधान्य दिलं. म्हणूनच लोकांचं अलोट प्रेम त्यांच्या वाट्याला आलं. त्यांचा हा संघर्ष, लोकांनी केलेलं प्रेम, त्यांनी उभं केलेलं काम या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे.
वाचा: पहिल्या पत्नीला दागिन्यांसह दिला अग्नी, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नीविषयी माहिती आहे का?

कधी होणार चित्रपट प्रदर्शित?

'कर्मयोगी आबासाहेब' चित्रपटात अनिकेत विश्वासराव, हार्दिक जोशी, देविका दफ्तरदार, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, प्रदीप वेलणकर, सुरेश विश्वकर्मा, अरबाज शेख, तानाजी गलगुंडे, घनश्याम दरोडे (छोटा पुढारी), अहमद देशमुख, वृंदा बाळ, निकिता सुखदेव,अली शेख, अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २५ ऑक्टोबर रोजी मराठीसह हिंदी भाषेतही जगभर रिलीज होत आहे.

Whats_app_banner