Chhaava Vs Pushapa Clash Cancle : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या आगामी 'छावा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अनेक दिवसांपासून चाहते त्याच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत होते. पण, त्यासाठी आता प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. या चित्रपटाची नवी रिलीज आज जाहीर करण्यात आली. यापूर्वी बॉक्स ऑफिसवर 'छावा'ची 'पुष्पा २'शी थेट टक्कर होती. तर, आता हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. चला जाणून घेऊया या चित्रपटाची नवीन रिलीज डेट काय आहे.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटात विकी कौशलसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. तर, बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित 'पुष्पा २' देखील याच दिवशी प्रदर्शित होत आहे. मात्र आता 'छावा' ६ डिसेंबर ऐवजी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी शाहिद कपूर आणि पूजा हेगडे यांचा 'देवा' हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, काही कारणास्तव या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. आता हा चित्रपट ३१ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या 'छावा' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. या चित्रपटात विकी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना येसू बाईची भूमिका साकारत आहे. तर, अक्षय खन्ना 'औरंगजेब'च्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान यांनी केली आहे.
आता ‘छावा’ चित्रपटाची रिलीज डेट बदलल्याने ‘पुष्पा २’ची वाट मोकळी झाली आहे. आता हा चित्रपट हिंदी पट्ट्यात चांगली कमाई करू शकतो, असा अंदाज बांधला जात आहे. ‘पुष्पा २’ हा २०२१मध्ये आलेल्या ‘पुष्पा : द राईज’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. मूळ तामिळ भाषेत असलेल्या या चित्रपटाला इतर भारतीय भाषांमध्ये देखील रिलीज करण्यात आले होते. आता या चित्रपटाची आगाऊ बुकिंग येत्या ३० नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. तर, हा चित्रपट आता १००० कोटींची कमाई करू शकतो, असा अंदाज देखील वर्तवला जात आहे.