Sambhaji Maharaj : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या 'छावा' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र, लक्ष्मण उतेकर यांच्या 'छावा'चा ट्रेलर पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर खळबळ उडाली, तर इतिहासप्रेमींकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. 'छावा'चा ट्रेलर इतका दमदार असून, देखील नेटकरी त्यावर का चिडले आहेत, हे जाणून घेऊया...
या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात एका दमदार संवादाने होते. तर, मुख्य संवादातून अतिशय महत्त्वाचा असलेला 'हिंदवी' हा शब्द नसणे आणि छत्रपती संभाजी महाराज नाचतानाचे अनपेक्षित दृश्य हे पाहून आता अनेकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. 'छावा'च्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल पाहायला मिळाला आहे. छत्रपती संभाजी महाराज हे एक आदरणीय योद्धा-राजा होते, त्यांना अशाप्रकारे नृत्य करताना दाखवून त्यांचा वीरतेचा वारसा कमी करण्याचा बॉलिवूडचा प्रयत्न असल्याचे, लोक म्हणत आहेत.
'छावा' चित्रपटाच्या ट्रेलरवर एका नेटिझनने कमेंट करत लिहिले की, ‘संभाजी राजे नाचताना दाखवले गेले, तेव्हा मला त्या दृश्याचा तिरस्कार वाटला. बॉलिवूड त्यांचा हा विकृत टच सगळीकडेच देण्याची गरज का भासते? आमचे राजा हे योद्धा आणि धर्माचे रक्षक होते, मनोरंजनासाठी नाचणारे नव्हते. हा त्यांचा अनादर आहे.’
आधीच नेटकरी भडकलेले असताना आगीत तेल ओतल्यासारखा मुख्य संवाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतून प्रेरित असलेली ही घोषणा 'हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा' या संवादात केवळ 'हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा',असे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले. स्वराज्याची सर्वसमावेशक आणि एकात्म अस्मिता दर्शवणारा हिंदवी हा शब्द वगळणे, म्हणजे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व जाणूनबुजून पुसून टाकण्यासारखे आहे, असे लोक म्हणत आहेत. एका नेटकऱ्याने आपला संताप व्यक्त करताना लिहिले की, 'मी 'हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा' हीच घोषणा ऐकून मोठा झालो आहे. बॉलिवूडने त्यांचा उदारमतवादी अजेंडा पुढे ढकलण्यासाठी ते मुद्दाम काढून टाकले आहे. हे अजिबात चालणार नाही.'
ट्रेलरमध्ये मुघल सम्राट औरंगजेबला अनावश्यक आदर दिल्याबद्दल टीकाही झाली आहे. अक्षय खन्नाच्या 'मुघल शहेनशाह औरंगजेब'च्या पात्राचा उल्लेख करणाऱ्या पोस्टरवर लोकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. काहींनी असा युक्तिवाद केला की, त्याचे कॅप्शन सोपे ठेवता आले असते. एका नेटकऱ्याने प्रश्न केला की,'मुगल शहेनशाह औरंगजेब' का लिहायचे? त्याला फक्त औरंगजेब म्हणणे पुरेसे नव्हते का? अशा पदव्या देऊन त्याचा गौरव का करता?'
एकंदरीतच 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर दमदार असला, तरी लोकांना त्यात या महत्त्वपूर्ण त्रुटी दिसल्याने आता त्यात बदल करण्यात यावे, अशी मागणी चाहत्यांकडून केली जात आहे. जर, मेकर्सनी यावर प्रतिक्रिया दिली नाही तर, हा वाद वाढण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.
संबंधित बातम्या