छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित 'छावा' हा हिंदी चित्रपट छत्तीसगडमध्ये करमुक्त करण्याचा निर्णय मुख्यमंत्री विष्णूदेव साई यांनी घेतला आहे. 'छावा' हा केवळ चित्रपट नसून आपल्या ऐतिहासिक परंपरा, धाडस आणि स्वाभिमानाला आदरांजली असल्याचं छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साई यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा समजून घेण्यासाठी प्रत्येक नागरिकाने हा सिनेमा पाहावा, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
मुघल आणि इतर आक्रमकांविरुद्ध जोरदार लढा देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचे विलक्षण धाडस, त्याग आणि सामरिक प्रतिभा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. यातून त्यांची अदम्य भावना आणि राष्ट्राप्रती असलेली अतूट बांधिलकी जिवंत होते आणि राष्ट्रवादाची तीव्र भावना दृढ होते, असे सरकारने म्हटले आहे.
'छावा' चित्रपटाला करसवलत दिल्यामुळे छत्तीसगडमधील सिनेरसिकांना तिकिटांचे दर कमी झाल्याने फायदा होणार असून, अधिकाधिक प्रेक्षक या ऐतिहासिक कलाकृतीला पाहू शकतील आणि त्यातून प्रेरणा घेऊ शकतील, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
समाजाला प्रेरणा देणाऱ्या आणि सांस्कृतिक भान जपणाऱ्या चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी छत्तीसगड सरकार कटिबद्ध असल्याचा दावा मुख्यमंत्री साई यांनी केला. भावी पिढीला भारताच्या गौरवशाली भूतकाळाशी जोडण्यासाठी छत्तीसगड ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि देशभक्तीपर चित्रपटांना पाठिंबा देत राहील, यावर त्यांनी भर दिला.
सर्वप्रथम गोव्यामध्ये छावा करमुक्त जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर मध्य प्रदेशात हा सिनेमा करमुक्त जाहीर करण्यात आला होता. दरम्यान, शेजारच्या गोवा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये ‘छावा’ चित्रपट करमुक्त केल्यानंतर महाराष्ट्रातली छावा करमुक्त करण्यात यावा अशी मागणी विविध पक्ष आणि संघटनांकडून केली जात आहे. मात्र याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 'इतर शेजारी राज्य जेव्हा एखादा सिनेमा करमुक्त म्हणून जाहीर करतात तेव्हा करमणूक कर माफ करत असतात. परंतु महाराष्ट्रात २०१७ सालापासून सिनेमांवर करमणूक कर लावला जात नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, छावा चित्रपटाच्या प्रमोशन करता अधिक चांगलं काय करता येईल यासाठी राज्य सरकार नक्कीच विचार करेल, असं फडणवीस म्हणाले. ‘छावा’ प्रदर्शित झाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रेक्षकांकडून या सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
संबंधित बातम्या