मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Chandu Champion Review: कार्तिक आर्यनच्या परफॉर्मन्समुळे मन होईल प्रसन्न! इमोशनल सीन्ससही कमाल

Chandu Champion Review: कार्तिक आर्यनच्या परफॉर्मन्समुळे मन होईल प्रसन्न! इमोशनल सीन्ससही कमाल

Jun 18, 2024 07:55 AM IST

Chandu Champion Review: ‘चंदू चॅम्पियन’मधील मुख्य नायक कार्तिक आर्यनव्यतिरिक्त या सहाय्यक कलाकारांनीही वर्चस्व गाजवले आहे. विजय राज, भुवन अरोरा यांचा अभिनय देखील सहज सुंदर झाला आहे.

chandu champion  kartik aaryan
chandu champion kartik aaryan

Chandu Champion Review in Marathi: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनची एक वर्षाची मेहनत नुकत्याच रिलीज झालेल्या त्याच्या ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटात पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने चित्रपटगृहात अक्षरशः धडक दिली आहे. आपल्या सहकाऱ्यांसाठी गोळ्या झेललेल्या, दोन वर्षे कोमात घालवलेल्या आणि नंतर परत आल्यावर चमत्कार करणाऱ्या एका खेळाडूची कहाणी या चित्रपटात पाहायला मिळाली आहे. कबीर खान दिग्दर्शित ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. ही व्यक्तिरेखा कार्तिक आर्यनने साकारली आहे, ज्याचा शानदार अभिनय आपल्याला आनंद देणारा आहे. त्याचबरोबर सहाय्यक कलाकार, सिनेमॅटोग्राफी, पार्श्वसंगीत हे सर्व देखील अप्रतिम झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काय आहे ‘चंदू चॅम्पियन’ची कथा?

‘चंदू चॅम्पियन’ ही एका मुरलीकांत नावाच्या व्यक्तीची कथा आहे, ज्याला चंदू म्हणून चिडवले जाते. पण आयुष्यातील संवाद त्यांना खऱ्या अर्थाने चॅम्पियन बनवतो. 'मी चंदू नाही, मी चॅम्पियन आहे', असा हा संवाद आहे. सुरुवातीच्या कथेत धमाल, मेहनत आणि खूप संघर्ष आहे. सर्वसामान्यांना प्रेरणा देईल अशी ही कथा आहे. एक चंदू कसा चॅम्पियन बनतो. ही कथा जुन्या मुरलीकांतपासून सुरू होते आणि फ्लॅशबॅकमध्ये जाते. ऑलंपिक सुवर्णपदक जिंकल्यावर चंदूचे तारुण्यातील जीवन यात दाखवले आहे. पुढे तो सैन्यात भरती होतो. पहिल्यांदा विमानात चढायला घाबरतो आणि १९६५च्या काश्मीरबरोबरच्या युद्धात साथीदारांना वाचवण्यासाठी छातीवर ९ गोळ्या झेलतो. या घटनेमुळे मुरलीकांत पेटकर यांचं आयुष्य बदलून गेलं होतं, जे चित्रपटातही पाहायला मिळालं आहे. दोन वर्षे कोमात राहिल्यानंतर जेव्हा मुरलीचा भाऊ त्याला खऱ्या जगासमोर घेऊन येतो, तेव्हा ते दृश्य मनाला स्पर्शून जाते. मुरलीला चालता येत नाही, पण जिद्दीने तो पोहायला शिकतो आणि मग चॅम्पियन बनतो.

एकंदरीत कसा आहे चित्रपट?

या चित्रपटाच्या कथेत एकच गोष्ट खटकते, ती म्हणजे मुरलीकांत पेटकर यांच्या कुटुंबाला थोडी जास्तीची कथा मिळाली असती, तर चित्रपट आणखी रंगला असता. या चित्रपटाचे संगीत तसे फार काही खास नाही. ‘सत्यनास’, ‘सिरफिरा’सारखी गाणी प्रेक्षकांना आवडतील. यातील काही संवाद मात्र कमाल आहेत, 'ये खोटा सिक्का, हुकुम का इक्का कैसे बन गया’ , ‘मैं चंदू नहीं चॅम्पियन है' या संवादांनी मनं जिंकली आहेत. तुम्हाला जर स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आवडत असतील, तर ‘चंदू चॅम्पियन’ अप्रतिम चित्रपट आहे.

कसा आहे कलाकारांचा अभिनय?

‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटात ‘कर्नेल सिंह’ची दमदार व्यक्तिरेखा साकारत अभिनेता भुवन अरोराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याशिवाय चंदूच्या भावाच्या भूमिकेत अनिरुद्ध दवे, तर विजय राज प्रशिक्षक झाले आहेत. या दोघांच्या अप्रतिम अभिनयाने मन प्रसन्न होते. श्रेयस तळपदे एका मजेदार पोलिस ऑफिसच्या भूमिकेत दिसला आहे. ही अशी पात्रे आहेत, जी कथेला मजेदार आणि गतिमान बनवण्यास मदत करतात. ‘चंदू चॅम्पियन’चे दिग्दर्शन करण्याबरोबरच कबीर खानने सुमित अरोरा आणि सुदीप्तो सरकार यांच्यासोबतीने कथा देखील लिहिली आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे.

WhatsApp channel