बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या आगामी 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. खुद्द कार्तिक आर्यनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. चित्रपटाचे पोस्टर रिलीज करताना कार्तिक आर्यनने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘चॅम्पियन येत आहे. माझ्या कारकिर्दीतील सर्वात खास आणि आव्हानात्मक चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना मला अभिमान वाटत आहे.’ पोस्टर बघून एक गोष्ट नक्की सांगता येईल की, कार्तिकचा असा अवतार आधी कुणी आणि कधीच पाहिला नसेल. कबीर खान दिग्दर्शित 'चंदू चॅम्पियन' हा पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांचा बायोपिक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे.
पोस्टरमध्ये कार्तिक आर्यन अतिशय दुबळ्या शरीरयष्टीत दिसला आहे. त्याने लंगोटी परिधान केली आहे आणि तो चिखलाने माखलेल्या रस्त्यावर धावत आहे. कार्तिक आर्यनची ही पोस्ट काही मिनिटांतच व्हायरल झाली असून, अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा चित्रपट १४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. कार्तिक आर्यनच्या एका चाहत्याने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, ‘तुम्ही किती मेहनत केली आहे हे आम्ही स्पष्टपणे पाहू शकतोय.’ तर, हा चित्रपट कार्तिक आर्यनच्या कारकिर्दीतील गेम चेंजर चित्रपट ठरू शकतो, असे म्हटले जात आहे.
कार्तिक आर्यनच्या या पोस्टवर एका युजरने कमेंट केली की, ‘क्षणभर ओळखू शकलो नाही. पण काय अप्रतिम लूक आहे.’ एका व्यक्तीने लिहिले की, ‘अक्षरशः शहारे आले.’ एका युजरने इमोजी टाकत लिहिले की, ‘काय बदल आहे भाऊ’. एका व्यक्तीने लिहिले की, ‘हा खरोखर कार्तिक आर्यन आहे का? विश्वास बसत नाही. मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल.’ एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, ‘माझ्याकडे शब्द नाहीत. त्याची दोन वर्षांची मेहनत. साखरेशिवाय आणि कठोर डाएटसह... हे त्याच्यासाठी खूप कठीण गेले असणार.’
या पोस्टरवर अशाच अनेक कमेंट्स करण्यात आल्या आहेत. पोस्टरच्या वरच्या बाजूला चित्रपटाची पंचलाईन लिहिली आहे. ‘ज्याने पराभव स्वीकारण्यास नकार दिला’, अशा आशयाच्या या ओळीने सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. साजिद नाडियाडवाला प्रोडक्शनच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या