छोट्या पड़द्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'चला हवा येऊ द्या' पाहिला जायचा. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक कलाकाराची वेगळी अशी ओळख निर्माण झाली आहे. या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी देखील कलाकारा मात्र कायम चर्चेत राहतात. आता अभिनेता रोहित चव्हाणचे नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे.
बाप्पाच्या आगमनाची सर्वत्र लगबग पाहायला मिळत आहे. अश्यातच मिसेस मुख्यमंत्री फेम अभिनेता तेजस बर्वेने दिग्दर्शित केलेलं ‘गजानना’ गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. हे गाणं व्हिडिओ स्वरूपात तुम्हाला अनुश्री फिल्म्सवर पाहायला मिळेल. या गाण्याची निर्मिती अनुश्री फिल्म्स आणि मयूर तातुसकर यांनी केली आहे. चला हवा येऊ द्या फेम ‘रोहीत चव्हाण’ हा मुख्य कलाकाराच्या भूमिकेत असून अक्षय आणि कांचन वाटवे हे सहकलाकाराच्या भूमिकेत आहेत. या गाण्याचं संगीत मयूर बहुळकर यांनी केलं असून गीतरचना प्रणव बापट यांची आहे. अनुश्री फिल्म्सची या आधी लढला मावळा रं.., भाव भक्ती विठोबा, पंढरीची आई, तु सखा श्रीहरी, देवा गणेशा अशी गाणी प्रसिद्ध झाली आहेत.
वाचा: अभिजीत सावंतचा बिग बॉस मराठीच्या घरातील गेम पाहून पत्नीने केली पोस्ट, म्हणाली...
अभिनेता - दिग्दर्शक तेजस बर्वेने या गाण्याच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. याविषयी बोलताना तो म्हणाला की, “माझं आणि बाप्पाचं नातं खूप जवळचं आहे. मी बाप्पाचा लाडका आहे असं लहानपणापासून मला वाटतं. मी बाप्पाच्या आगमनाला ढोल वाजवायचो. त्यासाठी मी खास ढोलपथक जॉइन केलेलं. मला अभिनयानंतर दिग्दर्शन करायची इच्छा होती आणि मला बाप्पापासूनच करायची होती. आणि तसचं घडलं स्वप्नपूर्ती झाली आणि माझ्या नवीन कामाचं श्री गणेशा या गाण्यापासून होतोय. एका मूर्तिकाराची आणि बाप्पाची भावनिक कथा सांगण्याचा यातून मी प्रयत्न केला आहे. या गाण्याचा शेवटचा सीन शूट करताना सेटवरील सर्वजण भावूक झाले होते. मी लहानपणी गणपती विसर्जनासाठी घाटावर गेलो होतो तेव्हा एक लहान मुलगी खूप रडत होती. त्याचवेळी मला या गाण्याची संकल्पना सुचली. आणि बाप्पाप्रति भावना मी यात मांडली. प्रेक्षकांना आमचं गाणं आवडतंय. आमच्या सर्व गाण्यांवर असंच प्रेम असू द्या हीच सदिच्छा.”