'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला विनोदवीर म्हणजे कुशल ब्रदिके. या कार्यक्रमातून कुशल महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. आपल्या विनोदबुद्धीने अनेकांच्या मनात कुशलने घर केले आहे. कुशलने नुकताच एक पोस्ट शेअर केली आहे. या मजेशीर पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
पावसाळा आला की हवेतील ओलावा वाढतो. त्यामुळे अनेक आजार पसरु लागतात, घरातील लाकडी वस्तू खराब होऊ लागतात, वाळत घातलेले कपडे वेळेत सुकत नाहीत अशा अनेक समस्या सुरु होतात. बऱ्याचदा कपडे सुकवण्यासाठी महिला अनेक टीप्सचा वापर करत असतात. मग कपडे स्टंडवर वाळत घेऊन ते पंख्यावर घेणे, किंवा रात्रभर पंखा लावून कपडे वाळत घालतात. आता अभिनेता कुशल बद्रिकेने पावसाळ्यात न सुकणाऱ्या कपड्यांसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
कुशल हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सतत काही ना काही पोस्ट करताना दिसतो. नुकताच त्याने घरातील एका खोलीचा फोटो शेअर केला आहे. या पूर्ण खोलीत त्याने कपडे वाळत घातल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने दिलेले कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधत आहे.
आपलं स्वतःचं घर झालं की त्यातली एक खोली आपण “कलेसाठी” समर्पित करायची , जिथे “कलेची” जोपासना झाली पाहिजे . हे आमच्या दोघांचंही स्वप्न होतं. आणि आज एका छोट्याश्या डिस्कशन नंतर माझ्या बायकोने मला पटवून दिलं की पावसाळ्यात कपडे वाळवणं ही सुद्धा एक “कलाच” आहे. आम्ही प्रेमाने घेतलेल्या घराच्या “खोलीचा” पुरेपूर वापर झाल्याचं समाधान माझ्या चेहऱ्यावर आहे.
अजूनही माझ्या प्रेमात किती “खोली” आहे हे मी हिला दाखवलं असतं.... पण जाऊदे.. पावसाळा आहे आणि वॉशिंग मशीनला कपड्यांचा एक लॉट अजून लावलेला आहे.
अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा पावसाळ्यात अन्न, वस्त्र, नि वारा होऊन बसतात. असा नवीन शोध आज मला लागला.
तळटीप- आमच्या त्या छोट्याश्या डिस्कशन नंतर माझ्या असं लक्षात आलंय की कथ्थक नाचणाऱ्या मुलींचा पाया आणि पाय दोन्ही खूप strong असतात. आता माझी कंबर बरी आहे काळजी नसावी. :- सुकून.
वाचा: 'तौबा तौबा'ची हूक स्टेप कतरिनाला आवडल्यानं विकीला आभाळ ठेंगणं; म्हणाला, ऑस्कर मिळाल्यासारखं वाटलं!
कुशल हा 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमानंतर आता हिंदी कॉमेडी शोमध्ये दिसत आहे. सोनी वाहिनीवर सुरु असलेल्या या कार्यक्रमाचे नाव 'मॅडनेस मचाएंगे' असे आहे. या शोमध्ये कुशलसोबत गौरव मोरे आणि हेमांगी कवी दिसत आहे.