आपल्या दमदार विनोदी अभिनयाने सगळ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणून भाऊ कदम ओळखला जातो. कलेला कोणत्याही रंग रुपाची आणि वयाची मर्यादा नसते हे भाऊ कदम यांनी साऱ्या जगाला दाखवून दिलं आहे. स्वतःची सगळी दुःख विसरून आणि अतिशय खडतर परिस्थितीवर मात करून, भाऊ कदम यांनी अवघ्या प्रेक्षकांना खळखळवून हसवले. त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. सध्या भाऊ कदमची एक वेगळीच चर्चा रंगली आहे.
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या भाऊ कदमचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये त्याने काळ्या रंगाचा कोट घातला असून हातात पिस्तूल दिसत आहे. आता ही भानगड नेमकी काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अभिनेते भाऊ कदम आणि विनोद हे समीकरण पक्क असताना आता मात्र कॉमेडीचा हा शार्प शूटर 'सिरियल किलर' ठरला आहे. हा फोटो त्यांच्या आगामी नाटकामधील लूक आहे.
भाऊ कदम यांच्या आगामी नाटकाचे नाव 'सिरियल किलर' असे आहे. या नाटकात मालिका अभिनेत्री आणि रिपोर्टर यांच्यामध्ये घडलेल्या घटनेने संशयाचे सुरुंग पेरले जातात. या घटनेनंतर 'सिरियल किलर' म्हणून आलेला खरंच 'सिरियल किलर' असतो की धोंगी असतो? याचा धमाल खेळ रंगतो. फुल टू कॉमेडीच्या रॅपरमध्ये गुंडाळून आलेला 'सिरियल किलर' काय धमाल उडवतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.
केदार देसाई लिखित दिग्दर्शित ‘सिरियल किलर’ हे धमाल नाटक येत्या शनिवारी १२ ऑक्टोबरला रंगभूमीवर दाखल होत आहे. यात भाऊ कदम यांची मध्यवर्ती भूमिका असून त्यांच्या जोडीला अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी, श्रद्धा हांडे,तेजस पिंगुळकर या नाटकात धमाल उडवणार आहेत.
वाचा: बॉलिवूडमध्ये १९८०साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमामुळे झाले होते रेल्वेचे नुकसान, चित्रपटही ठरला फ्लॉप
नवे नाटक येत असताना भाऊ कदम म्हणाला, ‘बेभान कॉमेडी आणि निखळ आनंदासोबतच आमच्या सगळ्यांच्या भन्नाट ट्यूनिंगची ट्रीट देणारं 'सिरियल किलर’ हे नाटक प्रेक्षकांना निखळ आनंद देईल.’ नाट्यरसिकांना नेहमी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न अद्वैत थिएटर्सने केला आहे. ‘सिरियल किलर’ च्या माध्यमातूनही सस्पेंस धमाल अशी नाट्यकृती आणली असून भाऊ कदमच्या चाहत्यांसाठी हे नाटक मनोरंजनाची दिलखुलास पर्वणी असणार आहे.
संबंधित बातम्या