Chhaava Movie Censor Board Cuts : आगामी 'छावा' चित्रपटातील वादग्रस्त लेझिम सीक्वेन्स काढून टाकल्यानंतर, सीबीएफसीने लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात अनेक बदल सुचवले आहेत. हा बहुचर्चित चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांच्या भावना दुखावू नयेत, म्हणून काही शब्द बदलण्यापासून ते इतिहासाला अपमानित करणारी दृश्ये काढून टाकण्यापर्यंत अनेकदा या चित्रपटावर कात्री चालवण्यात आली आहे. सेन्सॉर बोर्डाने नंतर कोणताही वाद निर्माण होऊ नये याची काळजी घेण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, या चित्रपटाला सीबीएफसीने यू/ए १६+ प्रमाणपत्र दिले आहे.
बोर्डाने ‘छावा’च्या निर्मात्यांना मराठा योद्ध्यांना साडी नेसताना दाखवलेला सीन काढून टाकण्यास सांगितले आहे. याव्यतिरिक्त, 'मुगल सल्तनत का जहर' हा संवाद 'उस समय, कई शासक और सल्तनत खुद को जिंदा रखने की कोशिश कर रहे थे' असा बदलण्यात आला आहे. याशिवाय, 'खून तो आखिर मुगलों का ही है' हे शब्द 'खून तो है औरंग का ही' असे बदलण्यात आले. 'हरामजादों' आणि 'हरामजादा' सारखे काही शब्द म्यूट करण्यात आले तर 'आमेन' ऐवजी 'जय भवानी' असे शब्द उच्चारण्यात आले आहेत.
'छावा' या चित्रपटात अभिनेता विकी कौशल 'छत्रपती संभाजी महाराजां'ची भूमिका साकारत आहे आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना 'महाराणी येसूबाईं'ची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक दृश्य दाखवण्यात आले होते, ज्यामध्ये विकी कौशल आणि रश्मिक मंदाना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाशी संबंधित पारंपारिक खेळ 'लेझिम'वर नाचताना दाखवण्यात आले होते. त्या सीन विरोधात लोकांनी आक्षेप घेतल्यानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शकाने ते दृश्य चित्रपटातून काढून टाकले.
या विषयी बोलताना विकी कौशल म्हणाला की, 'आम्ही चित्रपटावर काम सुरू केल्यावर शिवगर्जना अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याबद्दलच्या घोषणा केल्याशिवाय एकही दिवस कामाची सुरुवात देखील केली नाही. चित्रपटातील लेझिमचा भाग फक्त २०-३० सेकंदांचा होता. तो केवळ कथेचा भाग नव्हता, तर तो आपल्या संस्कृतीला जगभर घेऊन जाण्याचा प्रयत्न होता. छत्रपती संभाजी महाराज हे जनतेचे राजा होते आणि जर कोणी त्यांना आपल्यासोबत लेझिम खेळायला सांगितले असेल, तर राजांनी ते नक्कीच केले असेल. पण जर समस्त शिव प्रेमींना वाटत असेल की, हे चुकीचे आहे... तर ते चित्रपटाच्या कथेसाठी महत्त्वाचे नाही, म्हणून आम्ही ते काढून टाकले आहे'.
'छावा' चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता अक्षय खन्ना देखील या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसला आहे. हा चित्रपट एक ऐतिहासिक चित्रपट असणार आहे, जो छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहास मोठ्या पडद्याच्या माध्यमातून जगभरात पोहोचवणार आहे. १६८१ मध्ये राज्याभिषेकापासून सुरू झालेल्या शूर मराठा राजाच्या गौरवशाली इतिहासाला जगभरात पोहोचवण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. 'छावा' हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या