‘चल हल्ला बोल’ या मराठी चित्रपटातील प्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ यांची ‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो...’ ही कवितेवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. ‘कोण नामदेव ढसाळ?’ असा उर्मट सवाल सेन्सॉर बोर्डने केला आहे. सेन्सॉर बोर्डच्या या भूमिकेमुळे चित्रपटाचे निर्मातेच नव्हे तर विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आता सेन्सॉर बोर्ड विरोधातच ‘चल हल्ला बोल’ असा थेट इशारा विविध या सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे.
'लोकांचा सिनेमा' या चळवळीच्या माध्यमातून लेखक, दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी लोक वर्गणीतून ‘चल हल्ला बोल’ हा सिनेमा बनवला आहे. दलित पँथर, युवक क्रांती दल या चळवळींच्या पार्श्वभूमीवर दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, अल्पसंख्यांक, मुस्लिम, शेतकरी, स्त्रिया आदींच्या शोषणाविरुद्ध लढ्याची भूमिका या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. मात्र सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला परवानगी नाकारली आहे. सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी बोर्डाने तब्बल अकरा कट सूचविले आहेत.
याबाबत बोलताना महेश बनसोडे म्हणाले की, सेन्सॉर बोर्डाने प्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ यांची कविता सिनेमातू काढा असे लेखी कळवले आहे. याबाबत सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारला असता त्यांनी, ‘कोण नामदेव ढसाळ? आम्ही ओळखत नाही’ असा उर्मट सवाल निर्माता-दिग्दर्शकांना विचारला आहे. त्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सेन्सॉर बोर्ड जाणून बुजून बहुजन संस्कृती आणि अभिव्यक्तीवर बंदी आणत असल्यामुळे सेन्सॉर बोर्ड विरोधात मोहीम सुरू केल्याचे ‘लोकांचे दोस्त’ या संघटनेचे रवी भिलाणे यांनी स्पष्ट केले. या मोहिमेत ‘लोकांचे दोस्त’ संघटना तसेच लोकशाहीर संभाजी भगत, संभाजी ब्रिगेडचे प्रमोद शिंदे, पँथर सुमेध जाधव, कॉमेड सुबोध मोरे, दोस्त पोपट सातपुते, भानुदास धुरी, संजय शिंदे आदींनी पुढाकार घेतला आहे. विविध मान्यवरांनीही या मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे. 'लोकांचा सिनेमा' चळवळीच्या माध्यमातून ‘सेन्सॉर बोर्डची गरजच काय?’ असा प्रश्न विचारला जात आहे.
संबंधित बातम्या