चाहते अनेकदा आपल्या आवडत्या गायकाच्या, रॅपरच्या कॉन्सर्टला जाण्यासाठी उत्सुक असतात. लाइव्ह गाण्यांचा आनंद घेण्यासाठी ते तुफान गर्दी करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये प्रसिद्ध रॅपरवर चाहत्याने स्टेजच्या शेजारी उभं राहून रॅपरवर कोल्ड ड्रिंक फेकली आहे. ते पाहून रॅपरने जे काही केले ते पाहून नेटकरी संतापले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा दुसरा तिसरा कोणाचा नसून हॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर कार्डी बीचा आहे. कार्डी बीच्या लाइव्ह कॉन्सर्ट्सला तिचे चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. अशाच एका लाइव्ह कार्यक्रमामध्ये चाहत्याने तिच्या अंगावर ड्रिंक फेकले आहे. ड्रिंक फेकल्यानंतर कार्डी चांगलीच संतापली, चाहत्याच्या कृत्यामुळे अस्वस्थ होऊन तिने रागाच्या भरात हातातला माइक त्या चाहत्याच्या दिशेने फेकून मारला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
कार्डी बीचे वागणे पाहून एका यूजरने “कलाकारांवर सामान, वस्तू फेकणाऱ्या या लोकांना वेड्यांच्या रुग्णालयात भरती केले पाहिजे” असे म्हटले आहे. दुसऱ्या एका यूजरने “आजकाल या गर्दीपासून दूर राहण्याची आवश्यकता आहे. लोकं वेडी झाली आहेत” असे म्हटले आहे.
नंतर कार्डीच्या सुरक्षा रक्षकांनी ड्रिंक फेकणाऱ्या चाहतीला बाहेर काढले आहे. लाइव्ह कॉन्सर्टमध्ये असा गोंधळ होण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा अनेक घटना घडल्याचे समोर आले आहे. यापूर्वी भारतीय गायक अरिजित सिंह, सोनू निगम यांच्या कार्यक्रमात असे घडले आहे. २०१५ मध्ये कार्डी बीने ‘लव्ह अँड हिप हॉप: न्यूयॉर्क’ या टेलिव्हिजन शोच्या माध्यमातून करिअरला सुरुवात केली. आज ती प्रसिद्ध रॅपर म्हणून ओळखली जाते.
संबंधित बातम्या