Actor Kenneth Mitchell Death: ‘कॅप्टन मार्वल’ फेम अभिनेता केनेथ मिशेल यांचे निधन झाले आहे. केनेथ मिशेल यांनी वयाच्या ४९व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून चाहत्यांना ही दुःखद बातमी दिली आहे. अभिनेता केनेथ मिशेल गेली अनेक वर्षे अमायोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस या आजाराशी संबंधित समस्यांशी झुंज देत होते. मात्र, त्यांची ही झुंज अपयशी ठरली आहे. २४ फेब्रुवारी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेते केनेथ मिशेल मूळचे कॅनडाचे रहिवाशी होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुझान, २ मुले, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे.
केनेथ मिशेल यांच्या कुटुंबाने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, ‘केनेथ मिशेल, २५.११.१९७४ ~ २४.०२.२०२४, खूप जड अंतःकरणाने आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, आमचे प्रिय वडील, पती, काका, मुलगा आणि प्रिय मित्र केनेथ अलेक्झांडर मिशेल आता या जगात नाही.’ या निवेदनात पुढे म्हटले आहे की, 'गेली साडे पाच वर्षे केनेथने एएलएसच्या या गंभीर आजाराशी सामना केला. मात्र, तो प्रत्येक क्षण जगण्यात यशस्वी झाला. त्याचा दृढ विश्वास होता की, प्रत्येक दिवस खास असतो आणि आपण कधीही एकटे नसतो. प्रेम, करुणा आणि सालस असे त्याचेव्यक्तिमत्त्व सगळ्यांसाठी एक उत्तम उदाहरण आहे.’
अभिनेता केनेथ मिशेल यांचा जन्म १९७४ मध्ये टोरोंटो येथे झाला होता. त्याने 'स्टार ट्रेक' आणि 'कॅप्टन मार्वल'सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. त्याने टीव्ही विश्वातही भरपूर काम केले होते. त्यांना ‘स्टार ट्रेक: डिस्कव्हरी’, ‘कॅप्टन मार्वल’ आणि ‘जेरिको’मधून विशेष ओळख मिळाली आहे. प्रेक्षकांचीही त्यांना खूप पसंती मिळाली होती. केनेथ मिशेल आज जरी या जगात नसले, तरी चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान नेहमीच प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल.
संबंधित बातम्या