पंडित सी आर व्यास जन्मशताब्दीनिमित्त ‘गुणीजान बंदिश स्पर्धे’चं आयोजन; उत्कृष्ट युवा गायकाला सव्वा लाखाचं बक्षीस
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  पंडित सी आर व्यास जन्मशताब्दीनिमित्त ‘गुणीजान बंदिश स्पर्धे’चं आयोजन; उत्कृष्ट युवा गायकाला सव्वा लाखाचं बक्षीस

पंडित सी आर व्यास जन्मशताब्दीनिमित्त ‘गुणीजान बंदिश स्पर्धे’चं आयोजन; उत्कृष्ट युवा गायकाला सव्वा लाखाचं बक्षीस

HT Marathi Desk HT Marathi
Updated Jul 31, 2024 12:25 PM IST

पंडित सी. आर. व्यास यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त ‘गुणीजान बंदिश स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. १६ ते ३० वयोगटातील गायकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

Late vocalist Pandit C R Vyas
Late vocalist Pandit C R Vyas

गुणीजान रिसर्च, आर्ट, कल्चर अँड एज्युकेशन (GRACE) फाऊंडेशनतर्फे प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पंडित सी. आर. व्यास यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त देशपातळीवरील ‘गुणीजान बंदिश स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. १६ ते ३० वयोगटातील गायकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धा पुरुष व महिला विभागात होणार असून प्रत्येक श्रेणीतील विजेत्यांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.

या स्पर्धेविषयी बोलताना ग्रेस फाऊंडेशनचे संस्थापक तसेच पंडित सी. आर. व्यास यांचे पुत्र शशी व्यास म्हणाले, ‘माझे वडिल पंडित सी. आर. व्यास यांनी आपले आयुष्य हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी वाहून घेतले होते. त्यांच्या सांगीतिक आठवणींना उजाळा मिळावा म्हणून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. युवा प्रतिभावान गायक कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच त्यांना त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी हा स्पर्धेच्या आयोजना मागील हेतू आहे.’

विजेत्यास मिळणार सव्वा लाखाचे पारितोषिक

पुरुष आणि स्त्री विभागात स्वतंत्रपणे स्पर्धा घेतली जाणार असून विजेत्या स्पर्धकास (स्त्री आणि पुरुष) एक लाख २५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक दिले जाणार आहे. त्याच प्रमाणे द्वितीय क्रमांकास (स्त्री आणि पुरुष) ७५ हजार रुपये तर तृतीय क्रमांकास (स्त्री आणि पुरुष) ५० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. या स्पर्धेची प्रवेश फी १२०० रुपये आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी गायकांनी आपले व्हिडिओ संस्थेकडे पाठविणे आवश्यक असून या प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या स्पर्धकांना प्रत्यक्ष स्वरमंचावर सादरीकरण करावे लागणार आहे. यानंतर स्पर्धेतून बाद ठरलेल्या गायकांना सहभागाबद्दल योग्य ते पारितोषिक दिले जाणार आहे. स्पर्धकांना येण्याजाण्याचा तसेच राहण्याचा खर्च स्वत: करावा लागणार आहे. इच्छुक स्पर्धकांना www.gunijaanbandish.in वर स्पर्धेविषयी अधिक माहिती मिळू शकेल. त्याचप्रमाणे स्पर्धेसाठी नोंदणीही करता येईल. ३१ जुलै २०२४ ही नोंदणी करण्याची अखेरची तारीख आहे

'पंडित सी. आर. व्यास यांनी रचलेल्या बंदिशी या भारतीय शास्त्रीय संगीतातील उत्तमतेच्या द्योतक आहेत. या स्पर्धेच्या माध्यामातून पंडित सी. आर. व्यास यांच्या सांगीतिक वारशाचा सन्मान व्हावा तसेच युवा शास्त्रीय गायकांना या समृद्ध वारशाची माहिती व्हावी आणि तो जतन करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, ही स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका आहे, असे मनागेत व्यास यांच्या ज्येष्ठ शिष्या अर्पणा केळकर यांनी व्यक्त केले.

अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात ‘गुणीजान’ म्हणून ओळख असणारे दिवंगत पंडित सी. आर. व्यास यांनी २०० पेक्षा अधिक बंदिशी रचल्या असून त्या संगीत क्षेत्रात लोकप्रिय ठरल्या आहेत. पंडित सी. आर. व्यास यांना संगीतातील भरीव योगदानासाठी पद्मभूषण सन्मानासह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Whats_app_banner