पुणे पोर्शे अपघाताच प्रकरण सध्या प्रचंड चर्चेत आलं आहे. या कार अपघातात दोन निष्पाप तरुण लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणी गाडी चालवणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी सदर व्यक्तीला ताब्यात देखील घेतले. पुण्यातल्या कल्याणीनगरमध्ये हा प्रकार घडला. मध्यरात्री भरधाव वेगात आलेल्या आलिशान कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र, अटक केलेल्या आरोपीला अवघ्या बारा तासांत जामीन मंजूर झाला होता. मात्र, नंतर तो नाकारण्यात आला. यावर सोशल मीडियाच्या माध्यमातूनमधून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत आणि यावर केतकी चितळेनेही तिची भूमिका स्पष्ट केली आहे.
अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले बिनधास्त बोल बोलत असते. या प्रकरणावर देखील तिने थेट भाष्य केलं आहे. पुण्यात घडलेल्या या प्रकरणावर केतकी चितळे हिने संताप व्यक्त केला आहे. एक व्हिडीओ शेअर करून तिने आपला राग शब्दांत व्यक्त केला आहे. या व्हिडीओमध्ये केतकी चितळे म्हणाली की, ‘रात्री अडीच वाजताच्या सुमारास वेदांत अग्रवाल पबमधून निघाला आणि ३च्या सुमारास रस्त्यावर हा अपघात झाला. या अपघातामध्ये अश्विनी व अनिश या दोघांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेनंतर मृत व्यक्तींचे मित्रमैत्रीण पोलीस ठाण्यात गेले. मात्र, त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात टाकण्यात आले. तक्रार नोंदवून घेण्याऐवजी त्यांनाच जाब विचारण्यात आला. या सगळ्या प्रकरणात वेदांतला वाचवण्यासाठी पोलिसांकडून पुरेपूर मदत करण्याचा प्रयत्न केला गेला.’
पुढे केतकी म्हणाली की, ‘पण या अपघाताचे व्हिडीओ सोशल मीडियावर आधीच व्हायरल झाले होते. यामुळे पोलिसांचा हा प्रयत्न फसला.’ काही दिवसांपूर्वी एका प्रकरणात पुणे पोलिसांनी अभिनेत्री केतकी चितळे हिला देखील अटक केली होती. या दरम्यान आपल्याला कशी वागणूक मिळाली यावर देखील केतकी चितळे हिने भाष्य केलं. यावर बोलताना केतकी म्हणाली की, ‘मला भूक लागली तर, पोलिसांनी उत्तर दिलं की, इथे आसपास वडापावचं दुकान नाही आणि मला उपाशी ठेवलं. मात्र, एका गंभीर प्रकरणात अटकेत असलेल्या या वेदांतला रात्री साडेतीन वाजता बर्गर मिळावा म्हणून पोलीस प्रयत्न करतात.’
‘तो मुलगा तिथेही बसून आरामात खात आहे. त्याचे सगळे लाड पुरवले जात आहेत. अशा लाडावलेल्या बाळांना बर्गर दिला जातो आणि आमच्यासारख्या सामान्य लोकांना मात्र उपाशी ठेवलं जातं’, असं म्हणत केतकी चितळे हिने आपला संताप व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या