प्रसिद्ध ब्रिटीश अभिनेते टॉम विल्किंसन यांचे निधन झाले आहे. शनिवारी टॉम यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७५ वर्षांचे होते. टॉम यांच्या निधनाची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. त्यांच्या निधनाने हॉलिवूड चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
टॉम विल्किंसन यांनी शनिवारी राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी त्यांची पत्नी घरात होती. मात्र, टॉम यांच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. टॉम यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. २००७ साली मायकेल क्लेटनच्या सहाय्यक भूमिकेसाठी टॉम यांना ऑस्कर पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. तसेच २००१मध्ये प्रदर्शित झालेल्या इन द बेडरुम या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी देखील ऑस्कर नॉमिनेशन मिळाले होते. विल्किंसन यांनी एकूण १३० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
वाचा: यंदा गुजरातमध्ये पार पडणार फिल्मफेअर पुरस्कार सोहळा २०२४
१९९७च्या द फुल मॉन्टी या चित्रपटासाठी टॉम यांना बाफ्टा पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट आता जवळपास २६ वर्षांनंतर पुन्हा एकदा डिस्नेप्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. इतकच नाही तर टॉम विल्किंसनच्या सहा चित्रपटांना बाफ्टा पुरस्कारासाठी नॉमिनेशन मिळाले होते. टॉम विल्किन्सनने २००८च्या मिनीसीरीज जॉन अॅडम्समधील बेंजामिन फ्रँकलिनच्या भूमिकेसाठी एमी पुरस्कारासाठी आणि द केनेडीजमधील भूमिकेसाठी एमी पुरस्कारासाठी नॉमिनेशन मिळाले होते.