Dada Kondke News : दादा कोंडकेंच्या १२ चित्रपटांची मालकी एव्हरेस्ट कंपनीकडे; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय
Bombay High Court on Dada Kondke Movies : दिवंगत मराठी अभिनेते दादा कोंडके यांच्या चित्रपटांवरील मालकी हक्कांवर हायकोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे.
Bombay High Court on Dada Kondke Movies : दिवंगत मराठी अभिनेते आणि कॉमेडियन दादा कोंडके यांच्या १२ चित्रपटांची मालकी एका प्रिंट मीडिया कंपनीला देण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने जारी केले आहे. न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुनावणीत कोर्टाने बॉम्बे फिल्म एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड आणि नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांना दादा कोंडके यांच्या १२ चित्रपटांवरील मालकी हक्क सोडण्याचे आदेश दिले आहे. त्यानंतर आता दादा कोंडके यांच्या १२ चित्रपटांची मालकी आणि त्यासंदर्भातील अधिकार हे एव्हरेस्ट प्रिंट मीडिया हाऊस या कंपनीकडे देण्यात येणार आहे. कोंडके यांच्या १२ चित्रपटांची मालकी आता एव्हरेस्टकडे असणार आहे. तसेच या चित्रपटांचे संपूर्ण कॉपीराइट देखील याच कंपनीकडे असणार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
प्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात चित्रपटांवरील हक्क व अधिकार माणिक मोरे यांना दिल्याचं नमूद केलं होतं. त्यानंतर माणिक मोरे यांनी संबंधित कॉपीराईट अधिकार एव्हरेस्ट या कंपनीकडे हस्तांतरीत केले. त्यानंतर दादा कोंडके यांच्या १२ चित्रपटांवर एव्हरेस्ट या मीडिया कंपनीने दावा ठोकत थेट न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने 'सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, बोट लावीन तिथे गुदगुल्या, आली अंगावर, सासरचे धोतर, मुका घ्या मुका आणि अंधेरी रात में दिया तेरे हाथ में', या चित्रपटांची मालकी एव्हरेस्टकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मालकी हक्क सांगणाऱ्या शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठानच्या हृदयनाथ कडू देशमुख आणि अभिनेत्री उषा चव्हाण या दोन विश्वस्तांना एव्हरेस्टने अंतरिम दिलासा देण्याची मागणी केली आहे.
आम्हाला दादा कोंडके यांच्या १२ चित्रपटांची मालकी मिळाली आहे, अन्य चित्रपटांची नाही. हे आता स्पष्ट झालं आहे. आम्ही कोर्टाच्या निर्णयावर समाधानी असल्याचं एव्हरेस्ट कंपनीचे वकील आशिष कामत यांनी म्हटलं आहे. तर आम्ही दादा कोंडके यांच्या चित्रपटांचं संरक्षण करण्याचं काम करत असून कोर्टाचे आदेश मान्य असल्याचं प्रयोगशाळांचे वकील अनिश जाधव यांनी म्हटलं आहे. चित्रपटांवरील खटला हा संबंधित प्रयोगशाळांच्या विरोधात होता, एव्हरेस्टच्या विरोधात नाहीय. त्यामुळं आम्ही एव्हरेस्टला आणखी दिलासा देऊ शकत नसल्याचं न्यायमूर्ती छागला यांनी सुनावणीवेळी म्हटलं आहे.