Happy Birthday Boman Irani : अभिनयाच्या जगतात कधी आपल्या विनोदी भूमिकांनी तर, कधी गंभीर पात्र साकारून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणाऱ्या अभिनेता बोमन इराणी यांचा आज वाढदिवस आहे. वयाच्या ४२व्या वर्षी आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या बोमन यांनी अल्पवधीतच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. कधी त्यांनी ‘डॉक्टर अस्थाना’ बनून ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ची साथ दिली, तर कधी ‘वायरस’ बनून ‘थ्री इडियट्स’ना वळणावर आणलं. बोमन यांनी आजवर अनेक भूमिका पडद्यावर साकारल्या आहेत. आज त्याच्या ६५व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या गाजलेल्या काही पात्रांबद्दल जाणून घेऊया...
बोमनच्या सर्वात लोकप्रिय पात्रांपैकी एक म्हणजे 'थ्री इडियट्स'मधील वीरू सहस्त्रबुद्धे उर्फ 'व्हायरस'. २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील बोमन यांच्या व्यक्तिरेखेने सर्वांना आश्चर्यचकित केले. या अभिनेत्याने चित्रपटात एका महाविद्यालयीन मुख्याध्यापकाची भूमिका साकारली होती, ज्याला मुलांना त्याच्या जुन्या पद्धतीनं शिकवायला आवडतं होतं. मात्र, ही मुलं मिळून त्यांचं मतपरिवर्तन घडवून आणतात.
'मुन्नाभाई एमबीबीएस'मध्ये संजय दत्तला आयकॉनिक बनवणाऱ्या डॉ. अस्थाना यांना कोणी कसे विसरेल? 'मुन्ना भाई एमबीबीएस' २००३ साली रिलीज झाला होता. एका मुलीचा पिता आणि वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक असलेला अस्थाना संपूर्ण चित्रपटात मुन्नाच्या विचित्र कारवायांचा शिकार बनतो.
बोमन इराणी यांनी संजय दत्तसोबत अनेक चित्रपट केले आहेत. यातील एक म्हणजे 'लगे रहो मुन्ना भाई'. हा चित्रपट २००६मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील ‘लकी सिंह’ या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांना हसण्याची भरपूर संधी दिली. बोमन इराणी या भूमिकेत इतकं चपखल बसले की, थिएटर टाळ्यांच्या कडकडाटाने भरून गेले होते.
बोमन इराणी यांनी 'जॉली एलएलबी'मध्ये धूर्त वकिलाची भूमिका साकारली होती. २०१३मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात बोमन यांनी वकील राजपालची भूमिका साकारली होती. आजही लोक युट्युबवर राजपाल आणि जगदीश त्रिपाठी यांच्यातील वाद पुन्हा पुन्हा पाहतात.
'खोसला का घोसला'चा खुराना हा दिल्लीचा धूर्त व्यापारी आहे, जो सामान्य नागरिकांची अगदी सहज फसवणूक करतो. हा चित्रपट २००६ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील बोमनची 'खुराना' ही भूमिका जमीन बळकावणारा बिल्डर म्हणून प्रसिद्ध होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही, पण बोमन इराणी यांची व्यक्तिरेखा आजही लोकांच्या मनावर राज्य करते.
संबंधित बातम्या