बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. उर्मिला कायमच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहील आहे. आता उर्मिलाने घटस्फोटासाठी अर्ज केल्याची बातमी समोर येत आहे. तिने बिझनेसमन मॉडेल मोहसिन अख्तर मीरसोबतचा आठ वर्षांचा संसार मोडला आहे. त्यांनी मुंबईतील कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.
हिंदुस्तान टाईम्सल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये उर्मिला आणि मोहसिन यांनी लग्न केले होते. आता लग्नाच्या आठ वर्षांनंतर उर्मिलाने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. उर्मिलाने बराच विचार करून हा निर्णय घेतला आहे. मात्र, घटस्फोटाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. यासोबतच दोघांच्या संमतीने घटस्फोट होत नसल्याचेही बोलले जात आहे.
उर्मिला मातोंडकर आणि मोहसीन यांनी २०१६ साली अतिशय खासगी पद्धतीने विवाह केला. या विवाहसोहळ्याला केवळ कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवाला आमंत्रण देण्यात आले होते. त्यामध्ये चित्रपटसृष्टीतील काही लोकांचा देखील समावेश होता. विशेषत: बॉलिवूड ड्रेस डिझायनर मनीष मल्होत्रा याला आमंत्रण देण्यात आले होते. दोघांचे लग्न झाले तेव्हा त्यांच्या वेगळ्या धर्माची आणि वयाच्या अंतराची बरीच चर्चा झाली होती. खरं तर उर्मिला मोहसीनपेक्षा १० वर्षांनी मोठी होती. आता त्यांच्या लग्नाला ८ वर्षे झाली आहे. इतकी वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
वाचा: अशी मी मदनमंजिरी सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी; 'फुलवंती'मधील पहिल्या गाण्याने लावले प्रेक्षकांना वेड
उर्मिलाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर तिने १९७७ रोजी 'कर्मा' या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर तिने 'नरसिंह' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती मुख्य अभिनेत्री म्हणून दिसली होती. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. उर्मिला मातोंडकर २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॅकमेल चित्रपटातील बेवफा ब्युटी गाण्यात दिसली होती. त्यानंतर उर्मिलाने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. २०१९ साली उर्मिलाने राजकारणात प्रवेश केला. २०२० मध्ये तिने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण नंतर तिने काही दिवसांमध्ये शिवसेना पक्षात प्रवेश केला.