Aamir Khan, Sridevi : बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं. यापैकी काही जोड्या तर इतक्या गाजल्या की, आजही त्या प्रेक्षकांच्या मनात घर करून बसल्या आहेत. मात्र, असेही काही कलाकार आहेत, ज्यांनी बॉलिवूड गाजवून सुद्धा कधीच एकमेकांसोबत काम केले नाही. अशाच कलाकारांपैकी एक आहेत, आमिर खान आणि श्रीदेवी. दोन्ही कलाकारांनी आपापले चित्रपट खूप गाजवले. पण, कधीच एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी त्यांना मिळाली नाही. यामागचे मोठे कारण म्हणजे दोघांची उंची. दोघांच्या उंचीत तीन ते साडे तीन इंचांचे अंतर होते, ज्यामुळे ते कधीच पडद्यावर एकत्र दिसू शकले नाहीत.
बॉलिवूडमध्ये सुरुवातीपासूनच सौंदर्याचे काही विशेष मापदंड होते. कमी उंचीचा नायक किंवा नायिका यांची जोडी जमवताना अडचणी यायच्या. नायक हा उंचीने नायिकेपेक्षा उंच असावा, असा हा मापदंडच होता.आमिर खान आणि श्रीदेवी यांनी साधारण एकाच वर्षात बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली होती. मात्र, आमिर आपल्या भूमिकांवर वेगवेगळे प्रयोग करत असल्यामुळे त्याचा मोठा चित्रपट म्हणजेच 'कयामत से कयामत तक' येण्यास काही वेळ गेला. याधीच श्रीदेवीचा 'हिम्मतवाला' येऊन तुफान गाजला होता. तर, आमिर खानचा 'कयामत से कयामत तक' गाजल्यानंतर तोही प्रचंड चर्चेत होता.
या दरम्यान दोघांना एका फोटोशूटची ऑफर आली होती. या फोटोशूटसाठी आमिर खान आणि श्रीदेवी या दोघांनीही होकार दिला होता. दोघेही शूटिंगसाठी एकत्र आले होते. मात्र, या शूटसाठी जेव्हा श्रीदेवी सेटवर आली तेव्हा, तिने हिल्स परिधान केल्या होत्या. त्यामुळे ती आमिर खानपेक्षा खूप उंच दिसत होती. ते बघून आमिर खान थोडा गोंधळून गेला. आमिर खानची स्थिती जाणून श्रीदेवीने आपल्या हिल्स काढून ठेवल्या. मात्र, तरीही आमिर समोर श्रीदेवी उंच दिसत होती. अखेर ते फोटोशूट अशा प्रकारे पार पडले की, त्यात आमिर खान उंच दिसला. कसेबसे हे शूट पार पडले.
आमिर खानला श्रीदेवीचा अभिनय खूप आवडत होता. तिच्यासोबत एक चित्रपट तरी करावा, असे आमिर खानला वाटत होते. आमिर खान याने महेश भट्ट यांच्याकडे तशी कल्पना देखील मांडली होती. पण, तशी संधी कधीच जुळून आली नाही. काळाच्या ओघात दोघेही आपापल्या कामात पुढे जात राहिले. पण, कधीच एकत्र आले नाहीत.
संबंधित बातम्या