मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bollywood Nostalgia: सुष्मिता सेनमुळे बदलावं लागलं होतं ‘मैं हूं ना’चं पोस्टर! ‘हा’ किस्सा ऐकलायत का?

Bollywood Nostalgia: सुष्मिता सेनमुळे बदलावं लागलं होतं ‘मैं हूं ना’चं पोस्टर! ‘हा’ किस्सा ऐकलायत का?

Aug 29, 2023 01:44 PM IST

Bollywood Nostalgia Special: 'मैं हूं ना' या चित्रपटामध्ये सुष्मिता सेनने साकारलेली ‘चांदनी’ची भूमिका विशेष गाजली होती. हा चित्रपट सुष्मिताच्या करिअरमधला तो मैलाचा दगड ठरला.

Bollywood Nostalgia Special
Bollywood Nostalgia Special

Bollywood Nostalgia Special: बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या 'मैं हूं ना' या चित्रपटामध्ये सुष्मिता सेनने साकारलेली ‘चांदनी’ची भूमिका विशेष गाजली होती. या चित्रपटात तिची भूमिका छोटी होती, पण हा चित्रपट सुष्मिताच्या करिअरमधला तो मैलाचा दगड ठरला. आजही सुष्मिता सेन म्हटलं की, लाल साडीत पदर हवेत उडवत येणारी 'मैं हू ना'ची ‘चांदनी’ आठवते. हा चित्रपट फराह खानने दिग्दर्शित केला होता. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर फराह खानने सुष्मिता सेनची माफी मागून चित्रपटाचे पोस्टर बदलले होते.

‘मैं हूं ना’ हा चित्रपट २००४मध्ये रिलीज झाला होता. शाहरुख खानसोबतच अमृता राव, झायेद खान आणि सुनील शेट्टी हे कलाकार देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. तर, सुष्मिता सेनची भूमिका खूपच लहान होती. पण त्या छोट्याशा भूमिकेत सुष्मिताने असा प्रभाव टाकला होता की, यश चोप्रानेही फोन करून अभिनेत्रीचे कौतुक केले. इतकंच नाही तर 'मैं हूं ना' रिलीज झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबई शहरातून या चित्रपटाचे जुने पोस्टर्स उतरवण्यात आले होते. त्याजागी शाहरुख खान आणि सुष्मिता सेन यांची जोडी असलेले नवीन पोस्टर्स लावण्यात आले होते.

OTT Binge Watch: ‘दंगल’ ते ‘भाग मिल्खा भाग’; ओटीटीवरचे ‘हे’ स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट पाहिलेयत का?

नुकत्याच एका मुलाखतीत सुष्मिता सेन हा किस्सा सांगताना म्हणाली की, ‘माझी दिग्दर्शिका फराह खानने फोन केला आणि म्हणाली, सुश, मी फायनल एडिट पाहिले आहे आणि मला तुझी माफी मागायची आहे. अर्थात या चित्रपटात शाहरुख, अमृता आणि झायेद यांच्या भूमिका मोठ्या आहेत. पण, तू मात्र कमीच दिसली आहेस. यावर मी तिला म्हणाले की, ठीक आहे फराह, काही हरकत नाही. आपला तसा करार झाला होता. तू तुझे वचन पाळलेस आणि मी माझे पाळले. आता काळजी करू नका.’

ट्रेंडिंग न्यूज

‘मैं हूं ना’ हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर आपल्याला वाईट वाटू नये म्हणून तिने स्क्रीनिंगला जाणे टाळले होते. पण, नंतर प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहून सुष्मिता भारावून गेली होती. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये शाहरुख, अमृता आणि झायेद खान दिसत होते. मात्र, सुष्मिताचा दमदार अभिनय आणि प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहून दुसऱ्याच दिवशी हे पोस्टर्स बदलण्यात आले होते. यानंतर चित्रपटाच्या पोस्टर्सवर सुष्मिता आणि शाहरुख खानच होते. या चित्रपटातील सुष्मिता सेनच्या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले होते.

WhatsApp channel