
Bollywood Nostalgia Special: बॉलिवूडचे ‘दादामुनी’ अर्थात अभिनेते अशोक कुमार यांना बॉलिवूड इंडस्ट्रीचे पहिले स्टार मानले जाते. त्यांच्यापासूनच खऱ्या अर्थाने ‘स्टारडम’ची सुरुवात झाली होती. अशोक कुमार यांनी तब्बल ७ दशकं मनोरंजन विश्व गाजवलं. इतकी मोठी कारकीर्द असणारे ते पहिलेच बॉलिवूड कलाकार होते. अशोक कुमार यांच्याप्रमाणेच त्यांचे धाकटे बंधू किशोर कुमारही मनोरंजन विश्वात गाजले. दोन्ही भावांचा एकमेकांवर फार जीव होता. पण या दोन भावांच्या आयुष्यात एक अशी वाईट घटना घडली, ज्यानंतर दादमुनींनी आपला वाढदिवस कधीही साजरा न करण्याची शपथ घेतली.
अभिनेते अशोक कुमार यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९११ रोजी भागलपूर येथे झाला होता. पण, याच दिवशी १९८७मध्ये त्यांचे धाकटे भाऊ किशोर कुमार यांचे निधन झाले. या घटनेने अशोक कुमार यांना मोठा धक्का बसला. तेव्हापासून त्यांनी आपण कधीही वाढदिवस साजरा करणार नाही, अशी शपथ घेतली होती. अशोक कुमार यांनी मृत्यूपर्यंत कधीही आपला वाढदिवस साजरा केला नाही.
अशोक कुमार यांचे त्यांचे भाऊ किशोर कुमार यांच्याशी खूप खास नाते होते. किशोर कुमार यांनी आपल्यासारखंच अभिनेता व्हावं, अशी अशोक कुमार यांची इच्छा होती. पण, किशोर कुमार यांना अभिनय करायचा नव्हता. त्यांना आपले लक्ष गाण्यावर केंद्रित करायचे होते. अखेर अशोक कुमार यांनी किशोर कुमार यांच्या या निर्णयाला पाठिंबा दिला होता. दोघांच्या वयात १८ वर्षांचा फरक असला, तरी त्यांच्यात मैत्रीचे संबंध होते.
अशोक कुमार यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले होते. ‘किस्मत’, ‘मासूम’, ‘बेजुबान’, ‘गुमराह’, ‘ज्वेल थीफ’, ‘आशीर्वाद’, ‘खूबसुरत’, ‘सफर’, ‘शराफत’, ‘छोटी सी बात’, ‘मिस्टर इंडिया’, ‘गुड्डी’, ‘प्रेम नगर’ असे अनेक चित्रपट त्यांनी दिले आहेत. अशोक कुमार हे अतिशय प्रतिभावान व्यक्तिमत्व होते. १३ ऑक्टोबर रोजी अशोक कुमार यांचा वाढदिवस होता, त्याच दिवशी त्यांचा भाऊ किशोर कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर त्यांच्या वाढदिवसाची पार्टी रद्द झाली ती कायमचीच.. अशोक कुमार यांनी पुन्हा कधीही वाढदिवस साजरा केला नाही.
संबंधित बातम्या
