Bollywood Nostalgia Shammi Kapoor Mumtaz Love Story: बॉलिवूड अभिनेते शम्मी कपूर आणि अभिनेत्री मुमताज यांची प्रेमकहाणी ही बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली प्रेमकथा आहे. मुमताज या बहीण मल्लिका यांच्यासोबत पहिल्यांदा शम्मी कपूर यांच्या चित्रपटाच्या सेटवर गेल्या होत्या. पहिल्याच भेटीत मुमताज यांना शम्मी कपूर खूप आवडले होते. बहिणीसोबत सेटवर पोहचलेल्या मुमताज शम्मी कपूर यांच्यावर पाहताच क्षणी भाळल्या होत्या. अनेक वर्षांनी शम्मी कपूर स्वतः त्यांना लग्नासाठी प्रपोज करतील, असे त्यांना वाटले देखील नव्हते. मात्र, या प्रेमकथेचा शेवट अतिशय वाईट होता. ही प्रेमकहाणी अधुरी असली, तरी त्याची चर्चा आजही ऐकायला मिळते.
अभिनेत्री मुमताज आणि दिवंगत अभिनेते शम्मी कपूर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच खूप बोलले जाते. 'ब्रह्मचारी' या गाजलेल्या चित्रपटात शम्मी कपूर यांच्यासोबत काम केलेल्या मुमताज यांनी ‘झूम टीव्ही’शी बोलताना त्यांच्या आणि शम्मी कपूर यांच्या प्रेमकथेविषयी काही गोष्टी सांगितल्या. यात त्यांनी आपले शम्मी कपूर यांच्यावर प्रेम असताना देखील त्यांच्या प्रेमाला का नकार दिला, याचे कारण सांगितले आहे. जेव्हा शम्मी कपूर यांनी मुमताज यांना प्रपोज केला, तेव्हा मुमताज यांची कारकीर्द सुरू झाली होती. त्या यशाच्या पायऱ्या चढत होत्या. त्या तरुण आणि महत्त्वाकांक्षी होत्या, त्यांना पैसे कमवायचे होते. बॉलिवूडमध्ये नाव कमवायचे होते.
मुमताज यांनी या मुलाखतीत सांगितले की, ‘त्यांच्या पत्नी गीता बाली यांचे निधन झाले होते. 'आजकल तेरे मेरे प्यार के चर्चा' गाण्याच्या शूटिंगदरम्यान आम्ही जवळ आलो आणि एकमेकांच्या प्रेमात पडलो. आम्ही दोन वर्षे एकत्र होतो. या दरम्यान त्यांनी आपले प्रेम व्यक्त केले आणि विचारले की, तू माझ्याशी लग्न करशील का? माझे त्यांच्यावर खूप प्रेम होते. पण, त्यांनी मला सांगितले की, लग्नानंतर मी काम करू शकणार नाही. कपूर कुटुंबातील एकाही महिलेने लग्नानंतर काम केले नाही.’
त्यावेळी मुमताज अवघ्या १७ वर्षांच्या होत्या आणि शम्मी कपूर त्यांच्या वयाच्या दुप्पट होते. आपल्या निर्णयाबद्दल सांगताना मुमताज म्हणाल्या की, त्यांना प्रसिद्धी मिळवायची होती आणि म्हणूनच त्यांनी लग्नाची ऑफर नाकारली. त्यांनी शम्मी कपूर यांना सांगितले की, ‘मी लग्न करू शकणार नाही, कारण मला काम करायचे आहे आणि माझी स्वप्ने पूर्ण करायची आहेत. मला गृहिणी बनून मुलांची काळजी घेणे आणि घरातील इतर कामे हाताळायची नाहीत.’ मुमताज यांचा नकार ऐकून शम्मी कपूर खूप संतापले होते.