Bollywood Nostalgia: मनोरंजन विश्वामध्ये अनेक लोकांना म्हातारपणातही तरुण दिसायचं असतं. मात्र, संजीव कुमार हे असे अभिनेते होते ज्यांनी तरुणपणीच म्हातारपणाच्या भूमिका करायला सुरुवात केली होती. यामागचं कारण खूपच विचित्र होतं. आपल्याला खऱ्या आयुष्यात कधीच म्हातारपण दिसणार नाही, हे त्यांना आधीच माहीत होतं. वयाच्या ५०व्या वर्षी आपलं निधन होणार हे त्यांना आधीच ठावूक होतं. त्यामुळे त्यांना पडद्यावर आपलं म्हातारपण जगायचं होतं. त्यांच्याबाबतीतील भविष्यवाणी खरी ठरली होती. वयाच्या ५०व्या वर्षापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला होता. संजीव कुमार नेही म्हणायचे की, एका ज्योतिषाने त्यांना त्यांच्या मृत्यूबद्दल सांगितले होते.
संजीव कुमार यांनी चित्रपटांमध्ये खूप नाव आणि पैसा कमावला, पण त्यांच्या आयुष्यातील शेवटची वेळ चांगली गेली नाही. शेवटच्या काळात ते एकटेच होते आणि ते जगण्याची इच्छाशक्ती गमावून बसले होते. संजीव कुमार यांचे लग्न झाले नव्हते. याची दोन कारणे आहेत. लोक म्हणतात की, ते हेमा मालिनींवर खूप प्रेम करत होते. मात्र, ‘शोले’च्या सेटवर धर्मेंद्र आणि हेमा यांच्यातील जवळीक वाढली. त्यामुळे संजीव कुमार यांचे हृदय तुटले होते. त्यानंतर त्यांनी कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला. तर, दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना एका ज्योतिष्याने सांगितले होते की, ते वयाची पन्नाशी ओलांडणार नाहीत. यामुळे त्यांनी आधीच आपल्या मृत्यूचा अंदाज बांधला आणि कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता.
आपण खऱ्या आयुष्यात कधी वृद्धत्व अनुभवू शकणार नाही, असे वाटल्याने संजीव कुमार यांनी तरुणपणीच वृद्ध व्यक्तीची भूमिका साकारण्यास सुरुवात केली. अभिनेत्री तबस्सुम यांनी एकदा ‘तबस्सुम टॉकीज’मध्ये सांगितले होते की, ‘मी एकदा त्यांना विचारले होते की, तुम्ही वृद्धांच्या भूमिका का करत आहात?’ त्यावर ते म्हणाले की, ‘तबस्सुम मला एका ज्योतिष्याने सांगितले आहे की, मी फार काळ जगणार नाही आणि म्हातारपणही पाहणार नाही. त्यामुळे माझ्या नशिबात नसलेले वय मी पडद्यावर तरी जगू शकेन, यासाठी मला वृद्धाची भूमिका साकारायला आवडते.’
संजीव कुमार यांच्या कुटुंबाच्या वैद्यकीय इतिहासात असे काही तरी होते की, त्यांच्या कुटुंबातील पुरुष वयाची पन्नाशी गाठू शकले नाहीत. संजीव कुमार यांचे आजोबा, वडील, धाकटा भाऊ नकुल या सर्वांचे वयाच्या ५०व्या वर्षांआधीच निधन झाले होते. त्यामुळे संजीव कुमार यांनाही आपल्याला पन्नाशी ओलांडता येणार नाही याची खात्री होती. त्यांच्या घरातील सर्वांना हृदयविकाराचा झटका आला होता. संजीव कुमार यांचेही वयाच्या ४७व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.
संबंधित बातम्या