Mr India Movie Kissa : बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आले आहेत, जे कितीही जुने झाले तरी प्रेक्षक तितक्याच आवडीने ते चित्रपट बघतात. अशाच चित्रपटांपैकी एक आहे ‘मिस्टर इंडिया’. १९८७मध्ये आलेला 'मिस्टर इंडिया' हा हिंदी चित्रपट आजही भारतीय चित्रपटसृष्टीत आपलं स्थान कायम राखून आहे. अनिल कपूर, श्रीदेवी, सतीश कौशिक, अमरीश पुरी आणि अन्नू कपूर यांची जबरदस्त अभिनयाची जादू, चित्रपटाचे शानदार दिग्दर्शन आणि काळाच्या पुढे असलेली कथा यामुळे हा चित्रपट आजही चर्चेत आहे. विशेषतः श्रीदेवीच्या अभिनयाने या चित्रपटाला खास ठरवले होते. या चित्रपटाच्या सेटवरील अनेक किस्से शेखर कपूर यांनी एका मुलाखतीत शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी एक खास आणि भन्नाट किस्सा सांगितला.
‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटाच्या एक सीनमध्ये श्रीदेवीला झुरळांसोबत अभिनय करायचा होता, आणि या सीनच्या शूटिंगदरम्यान एक मजेशीर घटना घडली. शेखर कपूर आणि सिनेमॅटोग्राफर बाबा आझमी यांच्या मनात विचार आला की, आता झुरळाला सक्रिय कसं करायचं? अशावेळी त्यांनी तिथे एक अनोखा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. शेखर कपूर यांनी सांगितले की, ‘आम्ही विचार करत होतो की, झुरळाला कसा अभिनय करायला लावायचा. त्यासाठी आम्ही ओल्ड माँक रमची बाटली घेतली आणि झुरळाच्या समोर थोडी रम ओतली. आम्हाला वाटलं की झुरळ रम प्यायला लागेल आणि तो हळूहळू हालचाल करेल.’ शेखर कपूर हसून पुढे म्हणाले की, ‘आम्हाला खरं तर वाटलं की, झुरळाला रम आवडेल. आणि तसंच झालं. कदाचित त्याला ओल्ड माँक आवडली असावी. नंतर हा सीन आरामात शूट झाला.’ या मजेदार प्रसंगाने चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कलाकारांना देखील खूप हसवले होते.
या चित्रपटाच्या यशानंतर, निर्माते बोनी कपूर यांनी 'मिस्टर इंडिया'च्या सीक्वलची घोषणा केली होती. बोनी कपूर यांनी नुकताच खुलासा केला की, 'मिस्टर इंडिया'चा सीक्वल तर येणारच आहे, पण सध्या तो प्री-मॅच्युअर टप्प्यात आहे. आम्ही काही तांत्रिक गोष्टी आणि तयारी करत आहोत. झी स्टुडिओसह आम्ही काही विदेशी स्टुडिओसोबत सहकार्य करण्याच्या विचारात आहोत.’ बोनी कपूर यांनी यावर अधिक माहिती देताना सांगितले की, ‘या सगळ्या गोष्टी खूप लवकर जुळून येतील. पण आता हा प्रोजेक्ट एका प्रारंभिक टप्प्यात आहे. आम्ही आतच याबद्दल फार काही सांगू शकत नाही. पण लवकरच जाहीर करू.’
'मिस्टर इंडिया' हा चित्रपट खास करून श्रीदेवीच्या सुपरहिट भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात कायमचा घर करून राहिला आहे. या चित्रपटातील ‘मोगॅम्बो खुश हुआ’ या संवादाने चित्रपटाला एक नवा आयाम दिला. त्याचबरोबर अनिल कपूरने साकारलेल्या 'मिस्टर इंडिया'च्या भूमिकेनेही प्रेक्षकांना एक नवा अनुभव दिला. 'मिस्टर इंडिया'चा सीक्वल येणाऱ्या काळात नक्कीच प्रदर्शित होईल, अशी आशा प्रेक्षकांनाही आहे.