Meena Kumari Birth Anniversary: जेव्हा चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्रींची चर्चा होते, तेव्हा मीना कुमारी यांच्या नावाशिवाय ही चर्चा अपूर्ण वाटते. मीना कुमारी या हिंदी चित्रपटसृष्टीतील अशा अभिनेत्री होत्या, ज्यांच्यासोबत काम करणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न होते. मीना कुमारी यांना लहान वयातच नाव आणि प्रसिद्धी मिळू लागली होती. ना संपत्तीची, ना सौंदर्याची कमतरता, तरीही मीना कुमारी या आयुष्यभर प्रेमासाठी तळमळत राहिल्या. मीना कुमारी दिसायला खूप सुंदर होत्या. मात्र, त्यांचं आयुष्य अतिशय खडतर होतं. आज त्यांचा स्मृतिदिन आहे.
१ ऑगस्ट १९३३ रोजी जन्मलेल्या मीना कुमारी 'ट्रॅजेडी क्वीन' म्हणून प्रसिद्ध झाल्या. पण, त्यांना इतरही अनेक नावांनी हाक मारली जायची. त्यांचे खरे नाव महजबीन बानो होते. मीना कुमारी यांनी वयाच्या चौथ्या वर्षी चित्रपटात काम करायला सुरुवात केली. दिग्दर्शक विजय भट्ट यांनी मीना कुमारीला 'लेदरफेस'मध्ये कास्ट केले होते. वयाच्या १३व्या वर्षी त्यांनी 'अधुरी कहानी', 'पूजा', 'एक ही भूल', 'नई रोशनी', 'कसौटी', 'विजय', 'गरीब', 'प्रतिज्ञा', 'बेहान', 'लाल हवेली' आणि 'बेहान' या चित्रपटांमध्ये काम केले होते. सुरुवातीच्या काळात मीना कुमारी यांनी मुख्यतः विजय भट्ट यांच्यासोबत काम केले होते. विजय भट्ट यांना मीना कुमारीचे 'महजबीन' हे नाव त्यांना आवडले नाही. त्यामुळे विजय भट्ट यांनी मीना कुमारी यांचे नाव 'बेबी मीना' ठेवले. पुढे त्या याच नावाने ओळखल्या गेल्या.
मीना कुमारी या अभिनेत्री म्हणून जितकी यशस्वी होत्या, तितकीच अयशस्वी त्या प्रेमाच्या बाबतीत ठरल्या. त्यांच्या प्रेमकथेचा पहिला अध्याय लेखक आणि दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्यापासून सुरू झाला. मीना कुमारी यांनी कमाल अमरोही यांचा फोटो वर्तमानपत्रात पाहिला आणि त्या प्रेमात पडल्या. यानंतर, जेव्हा कमाल मीना यांना पहिल्यांदा भेटले, तेव्हा त्यांनाही प्रेमात पडायला फार वेळ लागला नाही. कमाल आधीच दोन बायका आणि तीन मुलांचे पिता होते. तरीही मीना कुमारी आणि कमाल अमरोही यांनी गुपचूप लग्न केले. कित्येक महिने याबद्दल कोणालाच काहीच कळले नाही. पण, जेव्हा अभिनेत्रीच्या वडिलांना हे कळले, तेव्हा मीना यांनी आपली सगळी वडिलोपार्जित मालमत्ता सोडली, आणि काही साड्या घेऊन त्या घरातून निघाल्या. सुरुवातीला सर्व काही चांगले होते, पण नंतर कमल आणि मीना यांच्यात दुरावा निर्माण होऊ लागला. कमाल यांना मीना यांची लोकप्रियता सहन होत नव्हती. त्यांनी मीनाकुमारी यांच्यावर अनेक बंधने लादली. त्यामुळे काही वर्षांनंतर या नात्यात दुरावा आला.
अभिनेता धर्मेंद्र चित्रपटसृष्टीत आले, तोपर्यंत मीना कुमारी सुपरस्टार बनल्या होत्या. मीना कुमारी यांच्या सांगण्यावरून धर्मेंद्र यांना अनेक चित्रपटांमध्ये काम मिळाले. मीना कुमारी यांनी धर्मेंद्र यांना अभिनयाच्या युक्त्या शिकवल्या. दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल हळवा कोपरा होता. पण, धर्मेंद्र विवाहित असल्याने त्यांना या प्रकरणात काहीच करता आले नाही. त्यामुळे दोघांच्या नात्यात दुरावा आला.
संशयामुळे कमाल अमरोही अनेकदा मीना कुमारी यांच्यावर नजर ठेवायचे. त्या जिथे जातील, तिथे त्यांच्यासोबत अंगरक्षक असायचे. या बंधनाने कंटाळलेल्या मीना यांना काही क्षण शांतता हवी होती. त्यामुळे त्या गुलजार यांच्याही जवळ आल्या. दोघांनाही कवितेची खूप आवड होती. मीना कुमारी यांच्या काव्यशैलीने आणि अभिनयाने गुलजारही प्रभावित झाले होते. मोकळ्या वेळेत दोघेही गप्पा मारायचे. आयुष्याच्या शेवटच्या दिवसात मीना कुमारी यांनी गुलजार यांच्या नावावर एक मौल्यवान वस्तू मृत्युपत्रात ठेवली होती. त्यांनी आपली वैयक्तिक डायरी, ज्यात त्यांनी कविता लिहिल्या होत्या, ती गुलजार यांना सुपूर्द केली.