Bollywood Nostalgia Kissa : अभिनेते राज कपूर हे बॉलिवूडमधलं खूप प्रसिद्ध नाव आहे. अभिनेता-दिग्दर्शक असलेल्या राज कपूर यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यांचे चित्रपट आजही सिनेप्रेमींचे भरपूर मनोरंजन करतात. पण, ज्याप्रमाणे राज कपूर त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत होते, त्याचप्रमाणे त्यांचे वैयक्तिक आयुष्यही प्रचंड चर्चेत होते. एकेकाळी विवाहित राज कपूर यांचे एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत अफेअर सुरू होते. पण, त्यांच्या पत्नीला हे कळल्यावर नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया...
राज कपूर यांचे लग्न कृष्णा कपूर यांच्याशी झाले होते. मात्र, लग्नानंतरही त्यांचे काही अभिनेत्रींसोबत अफेअर असल्याचे समोर आले होते. राज कपूर यांचे दिवंगत नातू ऋषी कपूर यांनी त्यांच्या 'खुल्लम खुल्ला' या पुस्तकात काही घटनांचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात त्यांनी वडील राज कपूर आणि वैजयंतीमाला यांच्या अफेअरची गोष्ट कळल्यावर आपल्या आईने काय केले होते, ते सांगितले आहे.
या पुस्तकात ऋषी कपूर यांनी लिहिले की, 'माझ्या वडिलांचे अभिनेत्री नर्गिससोबत अफेअर होते, अशी चर्चा होती. त्यावेळी मी खूप लहान होतो, त्यामुळे माझ्यावर या गोष्टींचा काहीही परिणाम झाला नाही. तर, यामुळे आमच्या घरी काही घडल्याचे देखील मला आठवत नाही. पण मला आठवतं, बाबाचं वैजयंतीमालासोबत अफेअर असल्याचं माझ्या आईला कळलं, तेव्हा ती मला घेऊन मरीन ड्राईव्हवरील नटराज हॉटेलमध्ये शिफ्ट झाली होती.'
ऋषी कपूर यांनी पुढे लिहिले की, 'माझ्या आईने ठरवले होते की, यावेळी ती मागे हटणार नाही. काही दिवस हॉटेलमध्ये राहिल्यानंतर आम्ही दोन महिन्यांसाठी चित्रकोट येथील अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झालो. माझ्या वडिलांनी माझ्या आईसाठी आणि आम्हा सर्वांसाठी राहण्यासाठी एक अपार्टमेंट विकत घेतले होते. त्यांनी आईला परत आणण्याचा प्रयत्न केला. पण आईने आयुष्याचा हा अध्याय पूर्ण होईपर्यंत हार मानली नाही.'
वैजयंतीमाला यांनी राज कपूर यांच्यावर अनेक आरोप केले होते. ऋषी कपूर यांनी या पुस्तकात लिहिले होते की,'हे पाहून त्यांची आई खूप संतापली होती. काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका मुलाखतीत वैजयंतीमाला यांनी दावा केला होता की, त्यांचे माझ्या वडिलांशी कधीही संबंध नव्हते. माझे वडील प्रसिद्धीचे भुकेले होते, त्यामुळेच त्यांनी या गोष्टी पसरवल्याचेही त्यांनी म्हटले होते. मला खूप राग आला होता. त्या हे असे कसे म्हणू शकतात? त्यांना या गोष्टी बोलण्याचा अधिकार नव्हता. कारण त्यावेळी माझे वडील त्यांची बाजू मांडण्यासाठी हयात नव्हते.'
राज कपूर आणि वैजयंती माला यांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. १९६१मध्ये आलेल्या 'नजराना' या चित्रपटात ते पहिल्यांदा एकत्र दिसले होते. यानंतर त्यांनी राज कपूर दिग्दर्शित 'संगम' चित्रपटात पुन्हा एकत्र काम केले. या चित्रपटात राजेंद्र कुमारही दिसले होते.
संबंधित बातम्या