Bollywood Nostalgia : सध्या बॉक्स ऑफिसवर अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २ : द रुल' हा चित्रपट तुफान कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात १३०० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. मात्र, ४७ वर्षांपूर्वी असाच एक चित्रपट आला होता, जो ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. हा चित्रपट प्रदर्शित होताच सुपरहिट झाला होता. एकाच वेळी दोन अभिनेते मुख्य भूमिकेत झळकत, या चित्रपटाने ब्लॉकबस्टर हिटचा टॅग मिळवला होता. 'धरम वीर' असे त्या चित्रपटाचे नाव होते.
'धरम वीर' हा चित्रपट १९७७ साली रिलीज झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर तुफान कल्ला केला होता. त्या काळातले दोन टॉप हिरो जितेंद्र आणि धर्मेंद्र यांनी त्यात काम केले होते. हा चित्रपट रोमान्स, इमोशन आणि जबरदस्त ॲक्शनने भरलेला होता. चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट तुफान गाजला. धर्मेंद्र आणि जितेंद्र यांच्यासोबत झीनत अमान, नीतू कपूर, प्राण, सुजित कुमार, रणजीत बेदी आणि आझाद इराणी सारखे स्टार्स महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. विशेष म्हणजे यात बॉबी देओलनेही अभिनय केला होता. त्याने वडील धर्मेंद्र यांची बालपणीची भूमिका साकारली होती.
'धरम वीर' हा चित्रपट धरम (धर्मेंद्र) आणि वीर (जितेंद्र) या जुळ्या भावांची कथा आहे, जे बालपणात विभक्त होतात आणि वेगवेगळ्या वातावरणात वाढतात. एक दिवशी दोघांची भेट होते. जसजसे ते मोठे होतात, तसतसे दोघे एकमेकांचे चांगले मित्र बनतात. पण, दोघे सख्खे भाऊ आहेत, हे त्यांना माहीत नसते.
आयएमडीबीनुसार, रिलीज झाल्यानंतर धर्मेंद्र आणि जितेंद्रचा 'धरम वीर' हा चित्रपट मोठा ब्लॉकबस्टर हिट ठरला. एक-दोन नव्हे, तर हा चित्रपट तब्बल ५० आठवड्यांहून अधिक काळ थिएटरमध्ये चालला होता. हा या वर्षातील दुसरा सर्वात मोठा हिट आणि १९७०च्या दशकातील सहावा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. 'धरम वीर' हा धर्मेंद्र यांच्या लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटासाठी त्यांना ‘वर्ल्ड आयर्न मॅन अवॉर्ड’ मिळाला होता. त्यांनी या चित्रपटातील आपल्या व्यक्तिरेखेसाठी असा पोशाख घातला होता, ज्याची खूप चर्चा झाली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनमोहन देसाई यांनी केले होते.
चित्रपट प्रदर्शित होऊन ४७ वर्षे झाली असली, तरी आजही तुम्ही घरी बसून याचा आनंद घेऊ शकता. धर्मेंद्र आणि जितेंद्र यांचा चित्रपट 'धरम वीर' ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे. या चित्रपटाचे सहलेखक कादर खान होते.
संबंधित बातम्या