Filmy Nostalgia Kissa : बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार त्यांच्याकडे आलेले चित्रपट नाकारतात आणि टेक चित्रपट पुढे जाऊन तूफान हिट होतात. अनेक बड्या कलाकारांसोबत देखील असं घडतं. असंच काहीस बॉलिवूडच्या एका चित्रपटासोबत घडलं आहे. हा चित्रपट सुरुवातीला शाहरुख खान, हृतिक रोशन आणि अभिषेक बच्चन यांना ऑफर करण्यात आला होता. मात्र, या तिन्ही कलाकारांनी हा चित्रपट नाकारला. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर इतका गाजला की, आजही लोक तो आवडीने पाहतात.
या चित्रपटाची कथा अतिशय तगडी होतीच, याशिवाय त्या चित्रपटातील गाणीही खूप गाजली. या गाण्यांना लोकांनी भरपूर प्रेम दिले. या चित्रपटाचे नाव आहे 'रंग दे बसंती'. २००६ मध्ये दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी 'रंग दे बसंती' हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटासाठी त्यांनी प्रथम शाहरुख खानशी संपर्क साधला होता. मात्र, त्याने नकार दिल्यानंतर राकेश यांनी स्क्रिप्टसह हृतिक रोशनलाही संपर्क केला. मात्र, दोघांनीही हा चित्रपट करण्यास नकार दिला. इतकंच नाही तर, अभिषेक बच्चन यानेही हा चित्रपट नाकारला होता.
'रंग दे बसंती' हा चित्रपट स्वातंत्र्यसैनिकांचा लढा आणि अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलेल्या तरुण पिढीची कथा सांगणारा आहे. आमिर खान, शर्मन जोशी, आर माधवन, सोहा अली खान, कुणाल कपूर, अतुल कुलकर्णी आणि सिद्धार्थ या कलाकारांनी या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट २६ जानेवारी २००६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला आता १९ वर्ष पूर्ण झाले आहेत. या चित्रपटातील दलजीत उर्फ डीजेच्या भूमिकेसाठी शाहरुख खानची निवड करण्यात आली होती. मात्र, शाहरुखच्या 'पहेली'चे शूटिंग सुरू असल्याने त्याला हा चित्रपट नाकारावा लागला. त्याचप्रमाणे, आर माधवनच्या भूमिकेसाठी हृतिकलाही अप्रोच करण्यात आले होते, पण त्यानेही नकार दिल. अभिषेक बच्चनलाही दुसऱ्या भूमिकेसाठी संपर्क साधण्यात आला होता, पण त्यानेही नकार दिला. या चित्रपटासाठी सोहा अली खान ही पहिली निवड नव्हती. या भूमिकेसाठी दिग्दर्शकाने प्रीती झिंटाशी संपर्क साधला होता, पण तिनेही चित्रपटाला नकार दिल्याचे म्हटले जाते. नंतर ही भूमिका सोहा अली खानला मिळाली आणि ती ब्लॉकबस्टर ठरली.
'रंग दे बसंती'ला समीक्षकांची प्रशंसा मिळाली आणि तो ब्लॉकबस्टर हिट ठरला. मात्र, बॉक्स ऑफिसवरील आकड्यांपेक्षा चित्रपटाची कथा अधिक पसंत केली गेली. 'रंग दे बसंती' हा चित्रपट तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरला. या चित्रपटाने सामाजिक बदलांना प्रोत्साहन दिले आणि मेणबत्ती मार्चपासून जेसिका लाल खून प्रकरणाच्या सखोल तपासापर्यंतच्या चळवळींना प्रोत्साहन दिले. जेसिका लालला न्याय मिळवून देण्यात या चित्रपटाचे योगदान किती होते हे 'नो वन किल्ड जेसिका'मध्ये देखील दाखवण्यात आले होते. 'रंग दे बसंती'ने त्यावेळी भारतातील बॉक्स ऑफिसचे सर्व विक्रम मोडले होते आणि पहिल्या आठवड्यात देशातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. २८ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात ९६ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला होता.
संबंधित बातम्या