Bollywood Nostalgia : बॉलिवूडमध्ये क्लासिक चित्रपटांच्या काळात असे अनेक चित्रपट झाले, जे आजही काही ना काही कारणांमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिले आहेत. अशाच चित्रपटांपैकी एक होता 'रझिया सुलतान'. १९८३ साली प्रदर्शित झालेला 'रझिया सुलतान' हा चित्रपट बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात महागडा आणि वादग्रस्त चित्रपटांपैकी एक ठरला. दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्या कल्पनेतील हा भव्यदिव्य चित्रपट हिंदी सिनेमाच्या प्रचंड नुकसानीस कारणीभूत ठरला. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत हेमा मालिनी, धर्मेंद्र आणि परवीन बाबी होते. पण त्यांची स्टार पॉवरही चित्रपटाला वाचवू शकली नाही.
कमाल अमरोही यांनी 'रझिया सुलतान'ला भव्य स्वरूप देण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. त्यांनी त्या काळात तब्बल १० कोटी रुपये खर्च करून हा चित्रपट बनवला होता. त्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीसाठी ही प्रचंड मोठी रक्कम होती. चित्रपटाच्या निर्मितीत ७ वर्षांहून अधिक काळ गेला. शेकडो तंत्रज्ञ आणि हजारो कलाकारांना यासाठी साईन करण्यात आले होते. सेट्स, कॉस्ट्यूम्स, आणि सिनेमॅटोग्राफी यांसाठी अतिशय खर्च करण्यात आला. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यावर केवळ २ कोटी रुपयांचीच कमाई करू शकला.
'रझिया सुलतान'मध्ये दाखवण्यात आलेला हेमा मालिनी आणि परवीन बाबी यांच्यातील इंटिमेट सीन त्या काळात खूपच बोल्ड मानला जात होता. प्रेक्षकांनी या दृश्यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. पारंपरिक विचारांच्या लोकांना हे दृश्य पचनी पडले नाही, ज्यामुळे चित्रपटावर प्रचंड टीका झाली. हा वादग्रस्त सीन चित्रपट फ्लॉप होण्याचे एक महत्त्वाचे कारण ठरला.
'रझिया सुलतान'च्या अपयशामुळे बॉलिवूडमध्ये आर्थिक संकट निर्माण झाले होते. चित्रपटाच्या निर्मितीसाठी अमरोही यांनी अनेक व्यावसायिकांकडून कर्ज घेतले होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कमाईवर अवलंबून असलेल्या तंत्रज्ञ व कलाकारांना मानधन देण्यात आले. मात्र, अपयशामुळे या सर्वांना नुकसान सहन करावे लागले. जवळपास संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टी काही काळ कर्जात बुडाली होती, इतका हा चित्रपट आपटला होता, असे म्हटले जाते.
'पाकीजा'सारखा अजरामर चित्रपट बनवणारे कमाल अमरोही यांची ही मोठी हार ठरली. या चित्रपटाच्या अपयशाने त्यांची दिग्दर्शक म्हणून कारकीर्दच संपुष्टात आली. हेमा मालिनी आणि परवीन बाबी यांना देखील या चित्रपटामुळे लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. 'रझिया सुलतान' हा ऐतिहासिक कथेवर आधारित चित्रपट होता. दिल्लीच्या पहिल्या महिला सुलतान रझिया सुलतान आणि त्यांचा गुलाम याकूत यांच्यातील प्रेमकथेवर हा चित्रपट आधारित होता. भव्यदिव्य सेट्स, उत्कृष्ट पोशाख, आणि शानदार संगीत असूनही चित्रपटाची पटकथा आणि मांडणी कमजोर असल्याचे मानले गेले. प्रेक्षकांपर्यंत ही कथा प्रभावीपणे पोहोचली नाही.
आजही 'रझिया सुलतान' हा चित्रपट बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात मोठ्या अपयशी प्रकल्पांपैकी एक म्हणून ओळखला जातो. यामधील संगीत आणि हेमा मालिनी यांचे अभिनय कौशल्य कौतुकास्पद ठरले, पण तोट्यामुळे हा चित्रपट कायमच एका दुर्दैवी आठवणीत अडकला आहे.