Bollywood Nostalgia : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा ही सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली जोडी पहिल्यांदा दुलाल गुहा यांच्या 'दो अंजाने' या चित्रपटात एकत्र झळकली होती. या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. मात्र, 'दो अंजाने'च्या आधी या दोघांनी एका चित्रपटाचे एकत्र शूटिंग सुरू केले होते. पण, त्यावेळी अमिताभ बच्चन यांचे चित्रपट फारसे चालत नव्हते, नव्हते म्हणून निर्माता-दिग्दर्शकाने अर्धा चित्रपट बनल्यानंतर त्यांना चित्रपटातून काढून टाकले होते. अमिताभ बच्चन यांनी आपल्या चित्रपटात काम करावे म्हणून निर्माते-दिग्दर्शक रांगेत उभे असतात. मात्र, हा तेव्हाचा काळ होता, जेव्हा ते इंडस्ट्रीत नवखे होते. अमिताभ बच्चन यांच्यासारख्या नवख्या कलाकाराला घेतल्याने या चित्रपटासाठी फायनान्सर आणि वितरक नकार देत होते. त्यामुळे अमिताभ बच्चन यांना हटवून दुसऱ्या एका अभिनेत्याला आणून हा चित्रपट पुन्हा शूट करून प्रदर्शित करण्यात आला.
'अपना पराया' असे या चित्रपटाचे नाव होते. अमिताभ यांच्यासोबत महिनाभर या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. मात्र, महिनाभरानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक कुंदन कुमार आणि निर्माते जीएम रोशन यांनी अमिताभ यांना काढून संजय खान यांना घेतले होते. याबाबत बोलताना दिग्दर्शक कुंदन कुमार यांनी सांगितले की, अमिताभ यांच्या सततच्या फ्लॉप चित्रपटांमुळे कोणताही वितरक हा चित्रपट घेण्यास तयार नव्हता. अशा स्थितीत फारशी रिस्क न घेता, आधीच शूट केलेली फिल्म बंद पेटीत टाकणे त्यांना योग्य वाटले. अमिताभच्या जागी संजय खान यांची निवड केल्यावर चित्रपटाचे नाव बदलून 'दुनिया का मेला' करण्यात आले.
याला नशीबाचा खेळ म्हणावा की नियतीचा ट्विस्ट, ज्या चित्रपटात संजय खान यांनी अमिताभ बच्चन यांची जागा घेतली तो फ्लॉप झाला आणि त्याचवेळी अमिताभ यांचा 'जंजीर' सुपर डुपर हिट ठरला. १९७३मध्ये रिलीज झालेल्या 'जंजीर' या चित्रपटाने अमिताभ बच्चन यांना रातोरात सुपरस्टार बनवले. यानंतर अमिताभ यांच्याकडे चित्रपटांची रांग लागली. तर, 'अपना पराया' म्हणजेच 'दुनिया का मेला' हा चित्रपट पुढच्या वर्षी १९७४मध्ये थिएटरमध्ये आला. पण, प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली. अमिताभ बच्चन यांना काढून टाकल्यानंतर हा चित्रपट नवीन निश्चल यांना ऑफर झाला होता, जे त्या काळात मोठे स्टार होते. पण, संघर्ष करणाऱ्या अभिनेत्याने सोडून दिलेला चित्रपट करणे योग्य नाही, असे म्हणत त्यांनी ही ऑफर नाकारली. यानंतर हा चित्रपट संजय खान यांच्या वाट्याला आला.
अमिताभ बच्चन जेव्हा 'अपना पराया'चे शूटिंग करत होते, तेव्हा अमिताभ आणि रेखा यांच्यावर एक गाणेही शूट करण्यात आले होते . 'तौबा तौबा' असे या गाण्याचे बोल होते. या चित्रपटात संजय खान यांची वर्णी लागली तेव्हा, रेखासोबत हेच गाणे त्यांच्यावर देखील चित्रीत झाले होते. ही दोन्ही गाणी आजही युट्यूबवर उपलब्ध आहेत.
संबंधित बातम्या