Bollywood Nostalgia : आजघडीला रिलीज होणारे सिनेमे बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होण्यापूर्वीच कोट्यवधींची आगाऊ बुकिंग करतात. असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांनी अवघ्या काही दिवसात ५०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का, असा कोणता चित्रपट होता ज्याने एक कोटी रुपये कमावून हिंदी सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदा आपल्या नावावर विक्रम नोंदवला? इतकंच नाही तर, हा चित्रपट तीन वर्षे थिएटरमध्ये सलग सुरू होता. चला तर मग जाणून घेऊयात असा कोणता चित्रपट आहे, ज्याने सगळ्यात पहिल्यांदा १ कोटींची कमाई केली.
'किस्मत' असे या चित्रपटाचे नाव असून, २ कोटींची कमाई करणारा हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट आहे. बॉलिवूडचा हा चित्रपट ९ जानेवारी १९४३ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेते अशोक कुमार मुख्य भूमिकेत दिसले होते. तर, त्या काळातील अतिशय सुंदर अभिनेत्री मुमताज शांती या अशोक कुमार यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. हा चित्रपट अत्यंत कमी बजेटमध्ये बनला होता, पण बॉक्स ऑफिसवर त्याने असा इतिहास रचला, जो त्यावेळी इतर कोणताही चित्रपट करू शकला नाही.
'किस्मत' या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्ञान मुखर्जी यांनी केले होते. त्याचबरोबर ‘बॉम्बे टॉकीज ’च्या बॅनरखाली हा चित्रपट बनवण्यात आला होता. या चित्रपटाची निर्मिती एस. मुखर्जी यांनी केली होती. अनिल बिस्वास यांनी संगीत दिले होते.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'किस्मत' चित्रपटाचे बजेट जवळपास ५ लाख होते. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर २ कोटींचा गल्ला जमवला होता. भारतीय सिनेसृष्टीत १ कोटींचा टप्पा ओलांडणारा हा पहिला भारतीय चित्रपट होता. अशोक कुमार आणि मुमताज शांती यांच्याव्यतिरिक्त मेहमूद, कानू रॉय आणि व्हीएच देसाई हे कलाकारही या चित्रपटात दिसले होते. तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल तर युट्युबव्यतिरिक्त प्राइम व्हिडिओवरही पाहू शकता. हा चित्रपट हिंदी सिनेमातील पहिला ब्लॉकबस्टर हिट चित्रपट मानला जातो.
या चित्रपटाच्या यशाने, भविष्यातील चित्रपट निर्मितीला एक नवीन दिशा दिली. चित्रपटाच्या सर्व घटकांमध्ये उत्तम समतोल राखला गेला होता. या चित्रपटाची कथा, संगीत, अभिनय, आणि प्रेक्षकांच्या भावनांचे प्रतिबिंब सगळ्याची भट्टी चांगली जमून आली होती. या चित्रपटाची लोकप्रियता आजही कायम आहे, आणि हा चित्रपट हिंदी सिनेमा इतिहासात पहिला १ कोटी कमावणारा चित्रपट म्हणून ओळखला जातो. 'किस्मत' चित्रपटाची कमाई आणि त्याचे यश आजही सिनेमासृष्टीतील एक प्रेरणा आहे, आणि तो आजही एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो ज्याने हिंदी सिनेमाला एक नवी उंची दिली.