Bollywood Nostalgia : हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास १००वर्षांहून अधिकचा आहे. या शतकभरात अनेक स्टार्सनी पडद्यावर खळबळ माजवली. काही कलाकार त्यांच्या रागीट स्वभावामुळे ओळखले जात होते, तर काही त्यांच्या हट्टीपणासाठी ओळखले जात होते. काही कलाकार त्यांच्या वक्तशीरपणामुळे चर्चेत असायचे, तर असेही काही कलाकार होते ज्यांनी सेटवर वेळेवर न येण्याची शपथच घेतली होती. अशाच कलाकारांमुळे एक चित्रपट प्रचंड चर्चेत आला होता. १९८०मध्ये प्रदर्शित झालेला ‘दोस्ताना’ चित्रपट, ज्यामध्ये अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत झीनत अमान मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. राज खोसला यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटासाठी झीनत अमान यांना मोठी तडजोड करावी लागली. याचा खुलासा नुकताच शर्मिला टागोर यांनी केला आहे.
शर्मिला टागोर जवळपास गेल्या ६५ वर्षांपासून चित्रपट विश्वात सक्रिय आहेत. त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत एक भन्नाट किस्सा शेअर केला. त्यांनी सेटवर नेहमी उशिरा येणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांचा एक किस्सा सांगितला. ते नेहमी सेटवर उशीरा यायचे. 'दोस्ताना'चे शूटिंग सुरू असताना अमिताभ बच्चन त्यांच्या शेड्युलच्या वेळेबाबत कडक होते, पण शत्रुघ्न सिन्हा नेहमी उशिरा यायचे. याच कारणामुळे झीनत अमानला दोन्ही स्टार्ससोबत वेळ जुळवून घेण्यासाठी स्वतःच्या शेड्यूलमध्ये तडजोड करावी लागत होती.
शर्मिला टागोर हा किस्सा सांगताना म्हणाल्या की,'शशी कपूरनंतर अमिताभ बच्चन हे एकमेव अभिनेते होते, जे वेळेवर सेटवर यायचे. 'दोस्ताना'मध्ये अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा आणि झीनत अमान मुख्य भूमिकेत होते. पण, या सेटवरही शत्रुघ्न सिन्हा नेहमी उशिरा यायचे. इतकंच काय तर, शत्रुघ्न सिन्हा स्वतःच्या लग्नात देखील उशिरा पोहोचले होते. संसदेतसुद्धा ते उशीराच येत होते. शत्रुघ्न सिन्हा यांनी कधीच वेळ पाळली नाही.
'दोस्ताना'च्या सेटवर ठीक २ वाजता बच्चन साहेबांची गाडी निघायची आणि शत्रुघ्न सिन्हा यांची गाडी आत यायची. शर्मिला टागोर गंमतीत म्हणाल्या की,'तुम्ही कल्पना करू शकता की, काय काय झालं असेल ज्यामुळे हा चित्रपट बनवताना राज खोसला यांना टक्कल पडलं. या चित्रपटात अमिताभ, शत्रुघ्न आणि झीनत एकाच फ्रेममध्ये कुठेही दिसले नाहीत. झीनत यांनी आपले वेळापत्रक त्या दोघांच्या वेळेनुसार शेड्यूल केले होते.
संबंधित बातम्या