Lata Mangeshkar Life Kissa : ‘स्वरसम्राज्ञी’ लता मंगेशकर आणि आशा भोसले ही भारतीय संगीत सृष्टीतील अशी दोन नावे आहेत, ज्यांनी बॉलिवूडला खूप काही दिले आहे. या दोन्ही बहिणी व्यावसायिक आघाडीवर जितक्या समर्पित आणि सक्रीय होत्या, तितक्याच त्यांचे परस्पर संबंध घट्ट होते. आशा भोसले यांनी नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये सांगितले की, या दोन्ही बहिणी (आशा आणि लता) बहुतेकवेळा केवळ पांढऱ्या रंगाच्या साड्याच का परिधान करायच्या. आशा भोसले आणि लता मंगेशकर यांनी त्यांच्या आउटफिट्ससाठी इतर रंग ट्राय केले नाहीत असे नाही, तर पांढरे कपडे घालण्यामागे त्यांचे एक कारण होते, जे त्यांनी अमृता राव आणि आरजे अनमोल यांच्याशी बोलताना सांगितले.
याबद्दल बोलताना आशा भोसले म्हणाल्या की, ‘दीदी (लता मंगेशकर) आणि मी नेहमी पांढऱ्या रंगाच्या साड्या परिधान करायचो. पांढरा रंग आपल्या त्वचेच्या रंगाला अधिक साजेसा वाटतो, असे आम्हाला वाटले. जर आम्ही वेगळा रंग परिधान केला तर, आम्ही अधिक सावळ्या दिसायचो. नंतर मी गुलाबी रंगाच्या साड्या घालू लागलो आणि दीदी माझ्याकडे जळजळीत कटाक्ष टाकायची. पण, मग मी हळूहळू गुलाबी रंगासोबत इतर रंग घालू लागले.’
आशा भोसले म्हणाल्या की, ‘लता दीदी जेव्हा जेव्हा मला सार्वजनिक ठिकाणी भेटत असत, तेव्हा त्या अतिशय औपचारिकरित्या वागायच्या पण घरात त्या आमच्या दीदी असायच्या.’
आशा भोसले म्हणाल्या की, 'दीदी घरी अगदी नॉर्मल असायची. पण, दीदी बाहेर माझ्याशी अगदी विनम्र आणि औपचारिक स्वरात बोलायची, घरी आमचं नातं वेगळंच होतं. आम्ही घरात आमच्या मातृ भाषेत, मराठीत बोलायचो आणि आमचे संभाषण खूप कॉमन होते. पण घराबाहेर पडताच त्या 'लता मंगेशकर' असायच्या. एक महान व्यक्ती, एक आयकॉन आणि तेव्हा आमच्या समीकरणांमध्ये अचानक बदल व्हायचा. गायनाच्या बाबतीत आम्हा दोघींमध्ये कोणतेही नाते नसायचे. काम हे आमच्यासाठी काम असायचे.'
पॉडकास्टदरम्यान आशा भोसले म्हणाल्या, ‘जेव्हा गाण्याचा विषय यायचा, तेव्हा आमच्यात कोणतंही नातं नसायचं. बाहेरच्या जगात त्या लता मंगेशकर होत्या, त्या जगात त्यांचं स्वतःचं स्थान होतं. आम्ही घरी गप्पा मारल्या, पण बाहेर अनौपचारिक गप्पा होत नव्हत्या. ती आपली आभा, तिची उपस्थिती, लता मंगेशकर म्हणून तिचे स्थान टिकवून ठेवत असे.’ लता मंगेशकर यांच्या आवाजाने बॉलिवूडला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. २०२२ साली लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.
संबंधित बातम्या