Sajid Khan Struggle Day : गेल्या काही काळापासून मनोरंजन विश्वात ‘मी टू’ची प्रकरणे समोर येत आहे. अशाच एका प्रकरणात साजिद खानचे नाव देखील समोर आले होते. २०१८ मध्ये साजिद खान ‘हाऊसफुल ४’चे शूटिंग करत होता. या दरम्यान, साजिद खानवर काही महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते, त्यानंतर साजिद खानच्या आयुष्यात मोठी उलथापालथ झाली होती. ‘मी टू’ अंतर्गत साजिद खानचं नाव समोर आलं तेव्हा त्याच्या हातून काम गेलं. त्याच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आपल्या आयुष्यातील कठीण टप्प्याबद्दल सांगितले. गेल्या सहा वर्षांत त्याने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा खुलासा त्याने यावेळी केला.
हिंदुस्थान टाईम्सशी खास बातचीत करताना साजिद खानला विचारण्यात आले की, ‘मीटू’चे आरोप झाल्यानंतर त्याच्या आयुष्याची पुढची सहा वर्षे कशी गेली? या प्रश्नाचे उत्तर देताना साजिद खान म्हणाला की, ‘गेल्या सहा वर्षांत मी अनेकदा आत्महत्या करण्याचा विचार केला आहे. माझ्याकडे नोकरी नसल्यामुळे सहा वर्षे खूप वाईट गेली. मी माझ्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतोय. उत्पन्न नसल्याने मला माझं घर विकून भाड्याच्या घरात राहावं लागलं. मी १४ वर्षांचा होतो, तेव्हा मी कमावायला सुरुवात केली. कारण माझ्या वडिलांचे निधन झाले. मी स्वत:च्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे, हे पाहण्यासाठी माझी आई आज जिवंत असती, तरी नक्कीच आनंदी झाली असती. मी तिच्या मुलापेक्षा तिचा केअरटेकर जास्त होतो. आयुष्य खूप संघर्षमय आहे.’
साजिद खानला विचारण्यात आले की, त्याच्यावरील आरोपांवर कुटुंबीयांनी काय प्रतिक्रिया दिली? यावर साजिद म्हणाला की, ‘जेव्हा हे घडले तेव्हा त्याच्या १० दिवस आधी मी जैसलमेरमध्ये शूटिंग करत होतो आणि माझ्या आईची तब्येत ठीक नव्हती. जेव्हा मला चित्रपट सोडावा लागला, तेव्हा मला भीती वाटत होती की, जर आईला कळलं तर तिला हृदयविकाराचा झटका येईल.’ साजिद पुढे म्हणाला की, त्याने आपली बहीण फराहला आईपासून सर्व वर्तमानपत्रे लपवण्यास सांगितले होते. १० दिवस तो सर्व काही ठीक आहे असे भासवत राहिला. या दरम्यान तो घराबाहेर पडायचा आणि सेटवर जात असल्याचे नाटक करून परत यायचा.
साजिद खान म्हणाला की, मी कधीही कोणत्याही महिलेबद्दल वाईट बोललो नाही आणि मी कधीच काही बोलणार नाही. बाकी ज्यांची नावे मीटूमध्ये आली ते कामावर परतले होते, पण मी परत येऊ शकलो नाही. तेव्हा मला कळलं की, आपण लोकांशी वागण्याची पद्धत बदलायला हवी.
संबंधित बातम्या