'मर्डर मुबार' आणि 'ए वतन मेरे वतन' या चित्रपटांच्या बॅक टू बॅक रिलीजनंतर आता अभिनेत्री सारा अली खान सध्या खूप चर्चेत आहे. ओरमॅक्स मीडियाच्या यादीत 'मर्डर मुबारक' टॉप १०च्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, तर 'ए वतन मेरे वतन'ला दुसरे स्थान मिळाले आहे. या दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान शनिवारी जुहू येथील शनी मंदिराबाहेर स्पॉट झाली होती. यावेळी सारा अली खानने मंदिरात प्रार्थना केली आणि त्यानंतर ती बाहेर येऊन गरजू लोकांना अन्नाची पाकिटे वाटताना दिसली. सारा अली खानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यावेळी 'केदारनाथ' फेम अभिनेत्री सारा अली खान कॅज्युअल लूकमध्ये दिसली. केशरी रंगाचा टॉप आणि ब्लॅक पँटमध्ये सारा अली खानचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सारा अली खानने मंदिराच्या प्रांगणाबाहेर बसलेल्या गरजू लोकांना अन्न वाटप करण्याची ही पद्धत चाहत्यांना आवडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत अभिनेत्रीचे कौतुक केले आहे.
सारा अली खानला स्वत:च्या हाताने गरिबांना अन्न वाटप करताना पाहून एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, ‘नेहमी अशीच राहा सारा.’ मंदिराबाहेरील लोकांना खायला देत असताना वेळी आपले फोटो काढू नका, असे आवाहन अभिनेत्रीने फोटोग्राफर्सना केले. मात्र, पॅप्स अभिनेत्रीचा व्हिडीओ रेकॉर्ड करत राहिले. एकीकडे चाहत्यांनी सोशल मीडियावर अभिनेत्रीचे कौतुक केले आहे. तर, दुसरीकडे काही लोकांनी नेहमीप्रमाणे हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले आहे.
एका सोशल मीडिया वापरकर्त्याने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, ‘किती दयाळू मुलगी आहे’. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, "लोकांना जेवण देते वेळी मला रेकॉर्ड नका करू असे पापाराझींना सांगणे हा खरोखरच साराचा चांगुलपणा होता. तसेच, यावेळी साराच्या लक्षात आले की, एका महिलेने तिच्या बाळाला उठवले आणि नम्रपणे सारा समोर उभं राहायला सांगितले’. आणखी एका चाहत्याने लिहिले की, ‘सारा अली खान नेहमीच दिलदार व्यक्तिमत्त्व होती. तिने उचललेलं हे पाऊल कौतुकास्पद आहे.’