बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार आहे. या दरम्यान कंगना रनौतचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कंगना रनौत, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ म्हटले होते. आता 'टाइम्स नाऊ समिट २०२४'मध्ये कंगना रनौत हिने उर्मिला मातोंडकरवर केलेल्या जुन्या 'सॉफ्ट पॉर्न स्टार'च्या टीकेवरून निर्माण झालेल्या वादावर भाष्य केले.
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरवर केलेल्या एका जुन्या वक्तव्याबद्दल बोलताना कंगना रनौत म्हणाली की, ‘मी कशाचेही समर्थन करत नाही आणि करणारही नाही. मात्र, जर तंदूरी मुर्गी, आयटम गर्ल, शीला की जवानी अशा शब्दांनी या अभिनेत्रींना कम्फर्टेबल वाटत असेल, तर सॉफ्ट पॉर्न स्टार शब्दाकडे काशाचतरी उल्लंघन केल्यासारखं का पाहिलं जातं? खरं तर जर त्यांना हे शब्द पटत असतील, तर मग या शब्दांना कशाला लाजायचं आहे? त्यांना लज्जित करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता.’
यावेळी बोलताना कंगना रनौत म्हणाली की, 'भारतात पॉर्न स्टार्सना प्रचंड मान मिळतो आणि त्याचं उदाहरण म्हणजे अभिनेत्री सनी लिओनी. मला सांगा, 'सॉफ्ट पॉर्न' किंवा 'पॉर्न स्टार' हे शब्द आक्षेपार्ह आहेत का? नाही! ते आक्षेपार्ह शब्द नाहीत. हा केवळ एक असा शब्द आहे, जो सामाजिकदृष्ट्या मान्य नाही. पॉर्न स्टार्सना भारतात जेवढा सन्मान मिळतो, तेव्हढा जगात इतरत्र कुठेही मिळत नाही.'
२०२०मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने म्हटले होते की, ‘उर्मिला मातोंडकर ज्या प्रकारे माझ्याबद्दल बोलत आहे आणि माझ्यावर हल्लाबोल करत आहेत ते चुकीचे आहे. कारण, त्यांना असं वाटत आहे की, मी तिकिटासाठी भाजपला पटवण्याचा प्रयत्न करत आहे. मला तिकीट मिळणे अवघड नाही, हे समजून घेण्यासाठी एखाद्याला हुशार असण्याची गरज नाही. उर्मिला एक सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. ती तिच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखली जात नाही, ती कशासाठी ओळखली जाते? तर सॉफ्ट पॉर्न… जर तिला तिकीट मिळू शकत असेल, तर मग मला का नाही?’
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार म्हणून राजकारणात पदार्पण केलेल्या आणि २०२०मध्ये शिवसेनेत प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकरने २०२०मध्ये एनडीटीव्हीच्या मुलाखतीत कंगनावर टीका केली होती. २०२०मध्ये संसदेत केलेल्या भाषणात संपूर्ण चित्रपटसृष्टीला 'कलंकित' केल्याबद्दल आक्षेप घेणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांचा अपमान केल्याबद्दल तिने कंगनावर टीका केली होती.