बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारून देखील प्रेक्षकांच्या मनात हक्काची आणि स्वतःची वेगळी जागा निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे कल्की कोचलीन (Kalki Koechlin). अनुराग कश्यपसोबत घटस्फोट आणि त्यानंतर दुसरं लग्न न करताच बाळाला जन्म देणारी अभिनेत्री तिच्या बिनधास्त अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतीच कल्की कोकणच्या समुद्र किनाऱ्यांवर धमाल करताना दिसली आहे. कल्की कोचलीन हिने सिंधुदुर्ग किनारपट्टीवर आपल्या सुट्यांचा आनंद लुटला आहे. सध्या गोव्यात स्थायिक झालेली कल्की केवळ कामाच्या निमित्तानेच मुंबईत येत असते. मात्र, या सगळ्यातून स्वतःसाठी वेळ काढत तिने कोकणचा समुद्र किनारा गाठला आणी तिथे बॉयफ्रेंडसोबत धमाल केली.
कोकणात धमाल करतानाचे फोटो कल्कीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले असून, ते व्हायरल होत आहेत. यावेळी कल्कीने स्कुबा डायव्हिंगचा आनंद लुटला. नेहमी कलाकार सुट्टी घेऊन परदेशात फिरायला जाताना दिसतात. मात्र, कल्की कोचलीन हिने अशा फॅन्सी जागा सोडून कोकण किनारपट्टीची निवड केली आहे. नुकताच कल्कीने तिचा ४०वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्तानेच ती सुट्टी घेऊन सिंधुदुर्गमध्ये पोहोचली होती. याबद्दल बोलताना कल्की म्हणाली की, ‘माझ्या मित्रपरिवाराला माहित आहे की, मला डायव्हिंग किती आवडते. पण आई झाल्यापासून मला या गोष्टींसाठी वेळच मिळालेला नाही. मात्र, यावेळी माझ्या मित्रमैत्रिणींनी मला आणि माझा पार्टनर गाय हर्शबर्ग याला सकाळी ६ वाजता एका ठिकाणी पोहोचायला सांगितलं’.
पुढे कल्की म्हणाली की, ‘आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा, एक बैलगाडी तिथे आमची वाट बघत उभी होतील. त्या बैलगाडीत आमचे डायव्हिंग गियर्स होते आणि ते बघून माझा आनंद गगनात मावत नव्हता. ही ट्रीप आमच्यासाठी खूपच रोमँटिक होती. पहिल्यांदाच आम्ही आमच्या चार वर्षांच्या मुलीपासून लांब राहिलो होतो. आमची मैत्रीण तिला सांभाळत होती. लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच आम्ही असे एकत्र बाहेर पडलो होतो. या सुट्ट्यांमुळे आम्हाला जाणवलं की, स्वतःसाठी असा वेळ काढणे खूप महत्त्वाचं आहे.’
अभिनेत्री कल्की कोचलीन हि सिंधुदुर्गमधील परुळे गावातील एका सुंदर फार्महाउसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होती. यावेळी कल्कीने स्थानिक लोकांशी गप्पा मारल्या आणि कोकणातील जेवणाचा आस्वाद घेतला. स्कुबा डायव्हिंग आवडणारी कल्की कोचलीन नेहमीच मालदीवमध्ये डायव्हिंग करताना दिसली होती. मात्र, आता महाराष्ट्रातही अशी एक सुंदर जागा असल्याचे कळल्यानंतर मला फारच आश्चर्य वाटलं, असं ती म्हणाली.